कोल्हापूर : बर्फीले पानी में फायर लावण्याची भाषा करणारी करिना, चिकनी चमेली कॅटरिना आणि प्रियंका चोप्रा या बॉलिवूडमधील तारकांचा आवाज फटाक्यांच्या बाजारपेठेत मात्र साफ फुसका ठरला आहे़ हॉलिवूडमधील आक्रमक अॅक्शन दृश्ये देणारे अभिनेते आणि अभिनेत्रींच्या प्रतिमा मोठ्या आवाजाच्या फटाक्यांच्या कव्हरवर तसेच रॉकेटवर आहेत़ फुलबाजे, भुईचक्र आणि किटकिट यावर मात्र बॉलिवूडमधील अभिनेते आणि अभिनेत्रींच्या छबी आहेत़ तरुणांमध्ये फेम असलेल्या सलमान खानलाही या बाजारपेठेने भुईचक्राचे स्थान दिले आहे़; तर अरनॉल्डचे रॉकेट आकाशात डबल बार करीत सुटले आहे़ या निमित्ताने हॉलिवूड आणि बॉलिवूड या दोन्ही इंडस्ट्रीजच्या अॅक्शन शैलीतील विरोधाभासच शहरातील फटाका स्टॉल्समध्ये दिसून येतो़ बॉलिवूडमधील कॅटरिना, करिना, प्रियंका चोप्रा, आलिया भट यांच्या प्रतिमा असलेले फटाके हेफुलबाजे प्रकारात मोडतात़ डबल बार, सायरन व्हिसल आणि हायडे बॉम्ब यासारख्या मोठ्या आवाजाच्या फटाक्यांच्या कव्हरवर हॉलिवूडमधील अभिनेते आणि अभिनेत्रींच्या प्रतिमा आहेत़ हॉलिवूडच्या तुलनेत बॉलिवूडमधील अभिनेत्रींच्या वाट्याला येणारी अॅक्शन दृश्ये व त्यातील आक्रमकपणा यातील स्पष्ट फरक फटाका स्टॉल्सवरही दिसून येतो़ बर्फीले पानी में फायर लावण्याची भाषा करणारी करिना कपूर फटाका बाजारपेठेत शोभेच्या दारूवरच लटकली आहे़ कॅटरिना आणि प्रियंकाची परिस्थिती अशीच आहे़ लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी कार्टून्सच्या तसेच प्राण्यांच्या प्रतिमेचा वापर खुबीने करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
फटाका बाजारपेठेवर सनातन प्रभाव
हिंदू देवदेवतांच्या प्रतिमांचा वापर फटाक्यांसाठी करण्यास सनातन संघटनेने विरोध केल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून अशा प्रकारचे फटाके बाजारपेठेतून गायब असल्याचे चित्र आहे़ याला पर्याय म्हणून उत्पादकांनी अभिनेते आणि अभिनेत्रींच्या तसेच कार्टून्सच्या प्रतिमांचाही वापर फटाक्यांच्या कव्हरसाठी केला आहे़ समृद्धीसाठी आज ‘लक्ष्मीपूजन’ सहा वाजल्यापासून मुहूर्त : पूजेच्या साहित्य खरेदीसाठी बाजारात लगबग कोल्हापूर : आपल्या कुटुंबात नेहमी सुख, शांती आणि समृद्धी नांदावी यासाठी दिवाळी अमावास्येला लक्ष्मी-कुबेराचे पूजन करण्याची पद्धत आहे. उद्या, गुरुवारी संध्याकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे. दिवाळी उत्सवातील अत्यंत महत्त्वाचा विधी मानल्या जाणाऱ्या या लक्ष्मीपूजनाच्या खरेदीसाठी शहरातील बाजारपेठांत नागरिकांची मोठी गर्दी होती. दिवाळीत वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशीनंतर लक्ष्मीपूजन केले जाते. हा विधी दिवाळी सणातील अतिशय महत्त्वाचा असतो. आपण करीत असलेल्या व्यवसायात, नोकरीच्या ठिकाणी आपल्याला यश मिळावे, घरात लक्ष्मीचा वास असावा आणि तिच्या कृपेने घरात सुख-शांती व समृद्धी नांदावी, अशी मनोकामना करीत ही पूजा केली जाते. संध्याकाळच्या प्रसन्न वातावरणात केल्या जाणाऱ्या या पूजेने मन अगदी प्रसन्न होते. घराप्रमाणेच दुकानात, कार्यालयांमध्येही आवर्जून लक्ष्मीपूजन केले जाते. गरीब, श्रीमंत, मोठा, लहान असे भेदाभेदांचे बंध दूर होऊन कुटुंबीय व आप्तेष्टांसोबत मनोभावे लक्ष्मी-कुबेराचे पूजन केले जाते. आज, बुधवार मध्यरात्री अमावास्या सुरू होत असून, उद्या गुरुवारी मध्यरात्री संपणार आहे. उद्या संध्याकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून ३९ मिनिटांपर्यंत लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे. लक्ष्मीपूजनाच्या साहित्य खरेदीसाठी आज बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होती. झेंडूची फुले, केरसुणी, आंब्याची पाने, पानसुपारी, बदाम, प्रसादासाठी बत्तासे, चिरमुरे, सुवासिक अगरबत्ती, धूप, फळे, वही या साहित्याची खरेदी केली जात होती. लक्ष्मीपूजन आणि पाडवा या दोन्ही दिवशी झेंडूची फुले लागतात; त्यामुळे आज बाजारात झेंडूच्या फुलांची मोठी आवक झाली असून ८० रुपये किलो असा झेंडूचा दर आहे. या साहित्याच्या खरेदीसाठी आज जोतिबा रोड, मिरजकर तिकटी, भाऊसिंगजी रोड, शिंगोशी मार्केट, टिंबर मार्केट या बाजारपेठांत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.