चंदगड : सडेगुडवळे (ता. चंदगड) येथील रामलिंग यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र चॅम्पियन पहिलवान सागर मोहोळकर याने गद्देलोट डावावर नॅशनल चॅम्पियन पहिलवान पृथ्वीराज पाटील याच्यावर मात करून प्रथम क्रमांकाचे ५१ हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. प्रकाश पाटील यांच्या सहकार्याने हे मैदान पार पडले.
संदीप पाटील, विक्रम मोरे, गौतम शिंदे, आकाश यळ्ळूरकर, संतोष अथणी, अभिषेक अंधारे, मारुती धारवाड, रवी पाटील, विनायक ओऊळकर, ओम घाडी, अमृत पाटील, नरेश इटगी आदी पहिलवानांसह महिला पहिलवान रक्षिता सूर्यवंशी, शालिना सिद्धी, ऋतुजा गुरव यांनीही विजय मिळविला.
महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषद व कोल्हापूर जिल्हा तालीम संघ यांच्या मान्यतेने आंतरराष्ट्रीय पंच राम पवार व महाराष्ट्र केसरी विष्णुपंत जोशीलकर, रामदास देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली भरविण्यात आलेल्या या कुस्ती स्पर्धेत पन्नास महिला-पुरुषांच्या निकाली कुस्त्या झाल्या.
कुस्ती आखड्याचे पूजन पहिलवान विष्णू जोशीलकर यांच्या हस्ते झाले. माजी मंत्री भरमू पाटील व भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाची कुस्ती लावण्यात आली. कृष्णा चौगुले यांनी सूत्रसंचालन केले.
---------------------
* फोटो ओळी : सडेगुडवळे (ता. चंदगड) येथील कुस्ती आखाड्यात पहिलवान पृथ्वीराज पाटील व पहिलवान सागर मोहोळकर यांची प्रथम क्रमांकाची कुस्ती लावताना महाराष्ट्र केसरी पहिलवान विष्णू जोशीलकर, नाना पवार, पहिलवान राम पवार व मान्यवर. प्रथम क्रमांकाची कुस्ती जिंकल्यानंतर पहिलवान सागर मोहोळकर याला समर्थकांनी खांद्यावर घेऊन जल्लोष केला.
क्रमांक : १००१२०२१-गड-०२/०३