कोल्हापूर : स्वत: कमी शिकलेल्या, प्रतिकूल परिस्थितीतदेखील आपल्या चार मुलांना पदवीधर करणाऱ्या राजारामपुरी सातव्या गल्लीतील ८३ वर्षीय रुक्मिणीबाई रामचंद्र डोईफोडे यांनी शिक्षणाला बळ देण्याचे विधायक पाऊल टाकले आहे. पती रामचंद्र यांचे स्मरण आणि नाव कायम राहावे यासाठी त्यांनी पदवीधर विद्यार्थ्यांना पुरस्काराच्या माध्यमातून आर्थिक स्वरूपातील पाठबळ देण्याचा उपक्रम राबविला आहे. त्यासाठी स्वत:च्या शिलकेतील दोन लाख रुपये देणगीच्या स्वरूपात शिवाजी विद्यापीठाला दिले आहेत.डोईफोडे कुटुंबीयांचे मूळ गाव पेठवडगाव. त्यांचे पूर्वज चपलाच्या व्यवसायानिमित्त कोल्हापुरात स्थायिक झाले. चप्पल लाईन येथे त्यांनी १९३२ मध्ये पहिले दुकान सुरू केले. रामचंद्र हे कोल्हापुरी चपलेचे उत्तम कारागीर म्हणून प्रसिद्ध होते. आझाद चौकात १९६६ मध्ये त्यांनी आदर्श फूटवेअर सुरू केले. व्यवसाय सांभाळून ते वारकरी सांप्रदायात कार्यरत होते. त्यांना रुक्मिणीबार्इंची चांगली साथ होती. प्रतिकूल परिस्थिती असतानादेखील त्यांनी आपल्या चार मुलांना उच्च शिक्षण दिले. पारंपारिक व्यवसायात जम बसल्याने घरची आर्थिक स्थिती सुधारली. ३५ वर्षांपूर्वी त्यांच्या पतींचे अपघाती निधन झाले. त्यांचे नाव आणि स्मरण कायम राहावे, अशी रुक्मिणीबाई यांची अनेक दिवसांपासून इच्छा होती; पण नेमके काय करावे हे त्यांच्या लक्षात येत नव्हते. त्यांनी याबाबत आपल्या मुलांशी चर्चा केली. त्यातून प्रतिकूल परिस्थितीतून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक स्वरूपातून पाठबळ देण्याचे त्यांनी ठरविले. त्यानुसार शिवाजी विद्यापीठाला दोन लाख रुपयांची देणगी दिली. यातून दरवर्षी बी. ए. परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करून ‘कमवा व शिका’ योजनेतून एम. ए. भाग एकमध्ये प्रवेश घेतलेल्या मागासवर्गीय (अनुसूचित जाती)मधील एक विद्यार्थी व एका विद्यार्थिनीस अशी दोन सन्मान पारितोषिके ‘रामचंद्र बापूजी डोईफोडे स्मृती पारितोषिक’ या नावाने दिली जाणार आहेत. शिक्षणाला बळ देण्याचा हा उपक्रम अनेकांना आदर्शवत ठरणारा आहे. (प्रतिनिधी)
शिक्षणाला बळ देणाऱ्या ‘रुक्मिणीबाई’
By admin | Updated: December 31, 2014 23:56 IST