जयसिंगपूर : सांगली - कोल्हापूर महामार्गावरील चिपरी (ता. शिरोळ) गावच्या हद्दीत पशुवैद्यकीय डॉक्टरवर तीक्ष्ण हत्याराने वार करुन जखमी केल्याप्रकरणी दोघांविरोधात जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी आकाश सुनील बेडगकर (वय २५) व तेजस प्रकाश कुलकर्णी (वय २५, दोघे रा. लक्ष्मीनगर धरणगुत्ती) अशी संशयितांची नावे आहेत. यामध्ये डॉ. सुधीर धनपाल भोकरे (वय ४८, रा. महावीर सोसायटी जवळ रुई, ता. हातकणंगले) हे जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हॉटेल सुमंगल जवळ घडली.
पोलिसांनी सांगितले की, डॉ. भोकरे हे मोटारसायकलवरून जयसिंगपूर ते कोल्हापूर महामार्गावरून जात होते. यावेळी संशयितांनी मोटारसायकल आडवी मारुन त्यांना अडविले. यावेळी शिवीगाळ करुन आकाश बेडगकर याने तीक्ष्ण हत्याराने डॉ. भोकरे यांच्या हनुवटीवर वार केला. यावेळी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन ही संशयितांनी काढून घेतली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.