कसबा तारळे : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याबरोबरच ब्रेक दे चेन अंतर्गत येथे गेल्या तीन दिवसांपासून अत्यावश्यक सेवेतील व्यापाऱ्यांबरोबरच विनामास्क विनाकारण फिरणाऱ्या ३३५ नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यामध्ये सातजणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्यांना तत्काळ राधानगरीतील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
जिल्ह्यासह ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या कमी-जास्त होत आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत कोरोना काळातील कडक निर्बंधांत मोठ्या प्रमाणात शिथिलता आल्याने नागरिकांचा रस्त्यावरील वावरही वाढला आहे. मुख्य बाजारपेठेच्या गावात तर ही संख्या नजरेत भरण्यासारखी आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग व मास्कबाबतची नियमावली पायदळी तुडवली जात आहे.
या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग व प्रशासनाने रस्त्यावर उतरून आरटीपीसीआर चाचणीचा धडाका लावला आहे.