हुपरी : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील दहा मतदारसंघांपैकी कागल, राधानगरी, कोल्हापूर दक्षिण व हातकणंगले असे चार विधानसभा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला मिळावेत, अशी आमची मागणी आहे. त्यापैकी नैसर्गिक न्यायाने आरक्षित असणाऱ्या हातकणंगले मतदारसंघासाठी रिपब्लिकन पक्ष महायुतीकडे खास आग्रह धरणार असल्याची माहिती पक्षाचे राज्य सचिव मंगलराव माळगे यांनी आज, सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, येत्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले) राज्य कार्यकारिणीची बैठक मुंबई येथे घेण्यात आली. या बैठकीत माझ्यासह प्रदेश सचिव प्रा. शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, आदी जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पक्षाध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी सर्वांची मते जाणून घेऊन महायुतीकडे राज्यातील ४५ जागांची मागणी करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यापैकी जिल्ह्यातील कागल, राधानगरी, कोल्हापूर दक्षिण व हातकणंगले असे चार मतदारसंघ मिळावेत, असे जिल्हा पदाधिकाऱ्यांनी यावेळी सूचविले.हातकणंगले राखीव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार डॉ. सुजित मिणचेकर कार्यरत आहेत. परंतु, नैसर्गिक न्यायानेच हा मतदारसंघ आरक्षित असल्याने या मतदारसंघावर रिपब्लिकन पक्षाचाच हक्क बसतो. त्यामुळे हा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षासाठीच सोडावा यासाठी आमचा आग्रह असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
चार जागांसाठी ‘आरपीआय’ आग्रही
By admin | Updated: July 22, 2014 00:40 IST