ठाणे : ७६व्या वरिष्ठ गटाच्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या रोहित हवालदारने दोन नवीन राज्य विक्रम नोंदवून दुसरा दिवस गाजवला. पुरुषांच्या ५० मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत रोहितने स्वत:चाच एक वर्षापूर्वी नोंदवलेला २९:७२ सेकंदाचा विक्रम मोडला आणि २८:२६ सेकंदाची नोंद केली. या स्पर्धेत पुण्याचा नील गुंडे (२९.९१ सेकंद ) दुसऱ्या, तर पुण्याचाच श्वेजल मानकर ३०.०० सेकंद अशा वेळेसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. रोहितने दुसरा राज्य विक्र म २०० मीटर वैयक्तिक मीडले प्रकारात केला. या स्पर्धेत रोहितने पुण्याच्या अभिजित गर्गने नोंदवलेला २.२१.३९ मिनिटांचा विक्रम पुसून टाकताना २.१६.५२ मिनिटे असा नवीन उच्चांक रचला. श्वेजल मानकरने २.१७.३८ मिनिटे अशा वेळेसह दुसरा क्रमांक मिळवला, तर जेसन स्मिथ २.१७.७६ मिनिटे अशा वेळेसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. ठाण्याच्या ज्योत्स्ना पानसरेने महिलांच्या २०० मीटर वैयक्तिक मिडले प्रकारात राज्य विक्रम बनवला. ज्योत्स्नाने कांची देसाईचा २.३४.३५ मिनिटांचा विक्रम मागे टाकत २.३०.८० मिनिटांचा विक्रम रचला. या स्पर्धेत राजना सालधना व ऋतुजा उदेशी अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.
कोल्हापूरच्या रोहितचा विक्रम
By admin | Updated: October 13, 2014 23:07 IST