कोल्हापूर : सिगारेट कोठे मिळते ते दाखवतो असे सांगून प्रवाशाला मध्यवर्ती बसस्थानक येथून दुचाकीवर बसवून पंचगंगा घाट परिसरात नेऊन बेदम मारहाण करुन त्याच्याकडील सुमारे ४० हजार रुपये किमतीचे दागिने लुटण्याचा प्रकार घडला. ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. याबाबत निखिल सुधीर कुलकर्णी (वय ३८ रा. जानकी अपार्टमेंट, गावभाग, इचलकरंजी) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात दोघा तरुणांवर शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, निखिल कुलकर्णी हे कोल्हापुरात एका खासगी कंपनीत नोकरीस आहेत, ते नोकरीच्या निमित्याने रोज इचलकरंजीहून कोल्हापूरला ये-जा करतात. सोमवारी रात्री ते इचलकरंजीला जाण्यासाठी कोल्हापुरात मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आले. त्यावेळी त्यांनी दोघा अनोळखी तरुणांकडे सिगारेट कोठे मिळेल अशी विचारणा केली. त्यावेळी त्यांनी सिगारेट मिळणारे ठिकाण दाखवतो असे सांगून त्यांना आपल्या पांढ-या रंगाच्या मोपेडवर बसवले. त्यांनी मोपेड थेट पंचगंगा घाट येथे नेली, तेथे मंदिराशेजारी कुलकर्णी यांना मोपेडवरुन उतरुन बेदम मारहाण केली. त्यांच्या हातातील सोन्याच्या दोन अंगठ्या, मोबाईल असा सुमारे ४० हजार रुपयेचा मुद्देमाल लुटला. तसेच त्यांना तेथेच सोडून दोघे पळून गेले. याबाबत त्यांनी मंगळवारी सायंकाळी शाहुपूरी पोलीस ठाण्यात अज्ञात दोघाविरोधात तक्रार दिली. पोलीस संशयित लुटारुंचा शोध घेत आहेत.
लुटारु २२ ते २५ वयोगटातील
कुलकर्णी यांनी लुटारुंचे वर्णन पोलिसांना सांगितले. मोपेडचालकाचे वय अंदाजे २५ वर्षे, अंगाने मजबूत रंगाने गव्हाळ, अंगात तपकीरी रंगाचा टी शटर, डोक्याला बारीक कुरळे केस. मोपेडवर पाठीमागे बसलेल्याचे वय अंदाजे २२ वर्षे, अंगाने सडपातळ, रंगाने गव्हाळ, अंगात पांढरा शर्ट, क्रिम रंगाची पॅट, डोक्यावर मागे विंचरलेले किंचित लांबट केस. दोघेही मराठी बोलणारे असे दोघा लुटारुंचे वर्णन आहे.