कोल्हापूर : एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पामधून कोल्हापुरात ‘आयआरबी’ कंपनीने ‘बीओटी’ तत्त्वावर केलेल्या रस्त्यांचा दर्जा सदोष असल्याचा निष्कर्ष ‘नोबेल कन्सल्टिंग’ कंपनीने आपल्या प्राथमिक अहवालात काढला आहे. कंपनीने सोमवारी हा अहवाल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या पुणे विभागाचे मुख्य अभियंता बी. एन. ओहोळ यांना सादर केला. ओहोळ हे या अहवालाची पडताळणी करून तो फेरमूल्यांकन समितीला सादर करणार आहेत. कोल्हापुरातील टोलविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आयआरबीच्या या रस्त्यांचे फेरमूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी समिती स्थापन केली. या समितीत मुंबई येथील राज्य रस्ते विकास महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय सरव्यवस्थापक तथा समितीचे अध्यक्ष संतोषकुमार, कोल्हापूर महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आर्किटेक्ट राजेंद्र सावंत, रामचंदानी या सदस्यांचा समावेश आहे. त्यानंतर राज्य रस्ते विकास महामंडळाने या रस्त्यांचा दर्जा तपासण्यासाठी पुणे येथील अमित सणगर यांच्या ‘नोबेल कन्सल्टिंग’ कंपनीला नियुक्त केले. मुंबईत सोमवारी ‘नोबेल कन्सल्टिंग’ कंपनीच्या प्रतिनिधींची बी. एन. ओहोळ यांच्याबरोबर बैठक झाली. या बैठकीत या कंपनीने आपला प्राथमिक अहवाल सादर केला. या अहवालात रस्त्यांचे मोजमाप व दरपत्रक, रस्त्यांच्या दर्जाबाबत असलेल्या काही त्रुटी, याची माहिती असल्याचे समजते. ओहोळ हे या अहवालाची पडताळणी करणार आहेत व लवकरच या अहवालाद्वारे फेरमूल्यांकन समितीला रस्त्यांच्या त्रुटी काय आहेत, ते कळविणार आहेत. त्यानंतर गरज भासल्यास पुन्हा या रस्त्यांच्या दर्जाची तपासणी होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
‘आयआरबी’चे रस्ते सदोष
By admin | Updated: July 14, 2015 01:12 IST