गडहिंग्लज : मे महिन्यात होणाऱ्या येथील श्री महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीची कोंडी दूर करण्याबरोबरच अनेक वर्षांपासून प्रलंबित रिंग रोडप्रश्नी तोडगा काढण्याचा प्रयत्न संयुक्त बैठकीत झाला. याप्रश्नी अंतिम तोडगा निघेपर्यंत यात्रा कालावधीत आपल्या खासगी शेतजमिनीतून तात्पुरत्या रहदारीसाठी रस्ता खुला करण्यास संबंधित शेतकऱ्यांनी शुक्रवारी सहमती दर्शविली.उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या शाहू सभागृहात ही बैठक झाली. नगररचना विभागाचे सहायक संचालक संजय चव्हाण, सहायक नगररचनाकार रा. पा. पाटील, मुख्याधिकारी तानाजी नरळे, नगरअभियंता रमेश पाटील, यात्रा समितीचे अध्यक्ष रमेश रिंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती.सुमारे ३० वर्षांपासून रिंगरोडचा प्रश्न प्रलंबित आहे. संकेश्वर रोड ते भडगाव रोड आणि कडगाव रोड ते आजरा रोड जोडणारा वळण रस्ता काही शेतकऱ्यांच्या खासगी जमिनीतून जात असल्यामुळे त्यांचा त्यास विरोध आहे. संबंधित शेतकरी शेखर पाटील, महेश पाटील व राजू पाटील यांच्यासह पाटीलमंडळी बैठकीस उपस्थित होते.रिंगरोडमध्ये जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना द्यावी लागणारी नुकसानभरपाई आणि विकास हक्क हस्तांतरण याबाबत सविस्तर चर्चा झाली. सार्वजनिक हितासाठी सकारात्मक भूमिका घेण्याची विनंती शेतकऱ्यांना करण्यात आली. मात्र, योग्य भरपाई मिळाल्याशिवाय रस्त्यासाठी जमीन न देण्याच्या भूमिकेवर ते ठाम राहिले. तथापि, श्री महालक्ष्मी यात्रा कालावधीतील संभाव्य वाहतुकीची कोंडी दूर होण्यासाठी पालिकेला व यात्रा समितीला सहकार्य म्हणून आपल्या शेतातून जाणारा रस्ता तात्पुरता खुला करण्याची तयारी संबंधित शेतकऱ्यांनी दाखवली. बैठकीस यात्रा समिती उपाध्यक्ष विठ्ठल भमानगोळ, सहसचिव चंद्रकांत सावंत, नगरसेवक रामदास कुराडे, हारूण सय्यद, राहुल घुगरे आदींसह नागरिक उपस्थित होते.
‘रिंग रोड’प्रश्नी तोडग्याचा प्रयत्न
By admin | Updated: February 13, 2015 23:51 IST