कणकवली : मुसळधार पावसाचा फटका तालुक्यातील फोंडाघाटाला बसला असून, काल-सोमवारी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास या घाटात तिसऱ्यांदा दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तब्बल आठ तासांनंतर कोसळलेली दरड हटवून या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. यावर्षी पावसाळ्यात या घाटात दरड कोसळण्याची ही तिसरी घटना आहे.कोल्हापूर मार्गावर फोंडा बसस्थानकापासून सुमारे साडेनऊ किलोमीटर अंतरावर घाटात ही दरड कोसळली. या मार्गावरून फोंड्याच्या दिशेने येणाऱ्या एस.टी.तील प्रवाशांनी याबाबतची माहिती फोंडा येथील हेल्प अकॅडमीच्या कार्यकर्त्यांना भ्रमणध्वनीवरून दिली. आपत्कालीन व्यवस्थापन कक्षालाही याबाबत कळविण्यात आले. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास शासकीय यंत्रणा घाटात दाखल झाली. जेसीबीच्या साहाय्याने ही दरड हटविण्याचे काम सुरू केले.आज, मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात यश आले होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास या मार्गावरील दगड दूर करून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. (वार्ताहर)
फोंडाघाटात दरड कोसळली
By admin | Updated: July 30, 2014 00:27 IST