लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : आझाद चौक ते मध्यवर्ती बसस्थानक मार्गावरील प्रवासादरम्यान एका प्रवाशाची बॅग रिक्षात विसरली होती. ही बॅग रिक्षाचालक शिवाजी शिंदे यांनी प्रामाणिकपणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कक्षात आणून दिली. त्यानंतर संबंधित प्रवाशाचा शोध घेऊन रोख २५ हजार आणि १० हजार रुपये किमतीचा मोबाईल हँडसेट अशा वस्तू त्यांना परत केल्या. रिक्षाचालक शिंदे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल शनिवारी पोलीस आणि नागरिकांनी त्यांचा सत्कार केला.
रिक्षात विसरलेल्या प्रवाशांच्या वस्तू प्रामाणिकपणे परत देणारा घटक म्हणून कोल्हापूरच्या रिक्षाचालकाची ओळख आहे. कोल्हापुरातील रिक्षाचालकांनी आजवर लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड परत केल्याची अनेक उदाहरणे आहेत. आझाद चौक थांब्यावरील रिक्षाचालक शिवाजी शिंदे यांच्या रिक्षात शनिवारी दुपारी एक प्रवासी बसला. त्यांना शिंदे यांनी मध्यवर्ती बसस्थानक रिक्षाथांब्यावर सोडले. त्यानंतर एका प्रवाशाला घेऊन ते निघून गेले. सुमारे अर्ध्या तासानंतर रिक्षाचालक शिंदे यांना आसनामागील जागेत एक बॅग आढळली. त्यात २५ हजारांची रोकड आणि किमती मोबाईल असल्याचे निदर्शनास आले. रिक्षाचालक शिंदे यांनी ताबडतोब ती बॅग मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील वाहतूक नियंत्रण शाखेच्या कक्षातील संदीप निळपणकर आणि आयुब पेंढारी या पोलीस कर्मचाऱ्यांकडे दिली. त्यांनी संबंधित प्रवाशाचा शोध घेऊन ही बॅग त्यांच्याकडे सुपूर्द केली. प्रवासी तुकाराम मोटे यांनी रिक्षाचालक शिंदे यांच कौतुक केले. रिक्षाचालक शिंदे यांचा पोलीस आणि नागरिकांनी सत्कार केला.