गणपती कोळी --कुरुंदवाड पालिकेतील नेत्यांचे टोकाचे राजकारण, दलबदलू नगरसेवक, प्रत्येक निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती यामुळे अपवाद वगळता कोणत्याही आघाडीला पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करता आला नाही़ खुर्चीसाठी राजकारण या धोरणामुळे शहराचा म्हणावा तसा विकास साधता आला नाही़ पालिकेत अनेक वर्षांपासून गटा-तटाचेच राजकारण आहे़ येथील नेतेमंडळी जिल्ह्याच्या पक्षीय राजकारणात सक्रिय असले तरी शहरात मात्र गटाच्याच राजकारणाला महत्त्व देत असल्याने व्यक्तीभोवतीच राजकारण केंद्रित आहे.पालिकेला ६५ वर्षांत ७२ नगराध्यक्ष लाभले आहेत़ २०११ साली झालेल्या निवडणुकीत रामचंद्र डांगे यांनी प्रथमच पालिकेच्या इतिहासात राष्ट्रवादी चिन्हावर निवडणूक लढवून पक्षीय राजकारणाला सुरुवात केली़ त्यांच्या विरोधात रावसाहेब पाटील यांची शहर सुधारणा आघाडी व जयराम पाटील यांची जनविकास आघाडी एकत्रित येऊन निवडणूक लढविली़ त्यामध्ये एकूण १७ जागांपैकी ८ जागा राष्ट्रवादीला, ६ जागा शहर सुधारणा आघाडी व ३ जागा जनविकास आघाडीला मिळाल्या़ निवडणुकीनंतर दोन पाटील एकत्र येऊन सत्ता स्थापन केली़ मात्र, आठ जागा जिंकून विरोधी बाकावर असलेले डांगे यांनी वर्षभरानंतर सत्तेतील जनविकास आघाडीला आपल्या गटात खेचत राष्ट्रवादी व जनविकास आघाडीची सत्ता स्थापन केली़ येथूनच नगरसेवक फोडाफोडीच्या राजकारणाला गती मिळाली़ सत्तेची खुर्ची सांभाळताना शहराच्या विकासाला ‘खो’ बसला़ शहराच्या विकासाला माजी मंत्री सतेज पाटील यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याने विधान परिषद निवडणूक मतदानावरून राष्ट्रवादीत फूट पडली़ राष्ट्रवादीचे पालिकेतील पक्षप्रतोद डांगे यांनी निवडणुकीतील मतासाठी महाडिक यांचा आग्रह धरल्याने राष्ट्रवादीत फूट पडून बहुतेक नगरसेवक सतेज पाटील यांच्या बाजूने राहिले़ त्यामुळे राष्ट्रवादीने डांगे यांची पक्षातून हकालपट्टी केल्याने शहरातील राजकीय धुसफूस अधिक गतिमान होत गेल्या़ आगामी निवडणुकीत नगराध्यक्ष निवड थेट जनतेतून होणार असल्याने नगराध्यक्ष आरक्षण सोडतीवरच आघाड्यांचे चित्र सादर होणार आहे़ तीनही आघाडी प्रमुखांनी घरातील उमेदवार देण्याच्या मानसिकतेत असल्याने तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे़ आरक्षण इतर समाजासाठी आरक्षित झाल्यास दोन पाटील पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर रामचंद्र डांगे यांचे रावसाहेब पाटील यांच्या शहर सुधारणाशीही सख्य असून, त्यांच्याबरोबर आघाडी न जुळल्यास ‘महादेवा’च्या कृपेने नाराजांना एकत्र करून स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी स्वतंत्रपणे लढण्याची तयारी त्यांनी केली आहे़ दुसरीकडे सर्वच राजकीय नेत्यांच्या कुरघोडीच्या राजकारणाला शह देण्यासाठी नांदणी बँकेचे संचालक रमेश भुजुगडे, एऩ डी़ पाटील, साताप्पा बागडी, आदी दिग्गज मंडळींनी चौथी आघाडी स्थापन करण्याच्या विचारात आहेत़ सध्या मात्र आघाडी नेत्यांनी वेट अॅन्ड वॉच ही भूमिका घेतली असून, निवडणुकीत पक्षीय की आघाडीचे राजकारण याबाबत गटनेते संभ्रमावस्थेत आहेत़ प्रत्यक्षात नगराध्यक्ष आरक्षण सोडतीनंतरच याचा फैसला होणार असून, आघाड्यांच्या शह काटशहाला खरी सुरुवात होणार आहे़
खुर्चीच्या राजकारणामुळे विकासावर परिणाम-
By admin | Updated: June 8, 2016 00:13 IST