कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा पॉझिटिव्हिटी दर अजूनही दहा टक्क्यांवर असल्याने सध्या सुरू असलेले निर्बंध पुढील शुक्रवारपर्यंत (दि.२५) कायम राहणार आहेत. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. त्यामुळे कोल्हापूरकरांना किमान आठवडाभर अजून कडक नियमांना सामोरे जावे लागणार आहे.
पूर्वीच्याच नियमानुसार आज शनिवार आणि उद्या विकेंड लॉकडाऊन होणार आहे. या काळात सकाळी ७ ते ४ यावेळेत जीवनावश्यक सेवा सुरू राहणार असून दुपारी ४ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदीसह कडक निर्बंध सुरूच राहणार आहेत.
राज्य सरकारच्या आपत्ती प्राधिकरणकडून ११ ते १७ जून या काळातील कोरोनाचा साप्ताहिक अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणची शुक्रवारी संध्याकाळी बैठक झाली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी देसाई यांनी सध्याचे निर्बंध जिल्ह्यात पुढील आदेश येईपर्यंत सुरूच राहतील, असे स्पष्ट केले. पुढील शुक्रवारी अहवाल आला आणि त्यात तर १० टक्केच्या आत पॉझिटिव्हिटी रेट खाली आला तर जिल्हा चौथ्या टप्प्यातून तिसऱ्या टप्प्यापर्यंत खाली येऊ शकतो. त्यामुळे निर्बंध काही प्रमाणात शिथिल होणार असल्याने आता २५ पर्यंत कडक निर्बंध गृहीत धरूनच नियोजन करण्यात येत आहे.
जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हीचा दर हा १० टक्क्यांपेक्षा जास्त आणि २० टक्क्यांच्या आत आहे. १३.७७ हा आजचा रेट आहे, जो राज्यात सर्वाधिक आहे. ऑक्सिजन बेड व्यापल्याची टक्केवारीदेखील ६० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे कोल्हापूर अजून आठ दिवस चौथ्या टप्प्यातच कायम राहणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन शिथिल होईल याकडे डोळे लावून बसलेल्या व्यापाऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडली आहे.