कोल्हापूर : दाजीपूर वन्यजीव अभयारण्यामधील समाविष्ट असलेल्या २९ गावांचे प्रतिबंधित अधिकार पूर्ववत होणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली. वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर ही माहिती देण्यात आली.
या अभयारण्याची अधिसूचना १६ सप्टेंबर १९८५ रोजी काढण्यात आली. यामध्ये राधानगरी तालुक्यातील २९ गावे बाधित होऊन ३५१.१६ चौरस किलोमीटर क्षेत्र अधिसूचनेत समाविष्ट करण्यात आले. यानंतर १९९५ मध्ये ४३६.१५ चौरस किलोमीटर इतक्या वाढीव क्षेत्राचा समावेश करण्यात आला. त्यामुळे या गावातील खरेदी-विक्री व्यवहार बंद झाले. परंतु याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आता गावांचे अधिकारी पूर्ववत मिळाल्याचे आबिटकर यांनी सांगितले. गावांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण झाली नसताना ग्रामस्थांवर निर्बंध लावणे चुकीचे असल्याचे यावेळी भरणे यांनी सांगितले.
यावेळी प्रधान वनसंरक्षक साईप्रसाद, प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव सुनील लिमये यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.