जयसिंगपूर / शिरोळ : जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाडसह तालुक्यात कडक लॉकडाऊनच्या रविवारी पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रस्ते निर्मनुष्य झाल्याने चौकाचौकात शुकशुकाट जाणवत होता, तर शिवतीर्थ कुरुंदवाड, शिरोळ येथील शिवाजी चौक तसेच जयसिंगपुरातील क्रांती चौकात पोलिसांनी रस्त्यावरून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली. अत्यावश्यक सेवा वगळता पेट्रोल पंपावर पेट्रोल विक्रीही बंद करण्यात आली होती.
जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी तालुक्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळला. रस्ते निर्मनुष्य झाल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. तर काही ठिकाणी पोलिसांकडून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांकडून कारवाई केली जात होती.
रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे अनेक नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले. दूध संकलन सकाळी व सायंकाळी दोन तास सुरू करण्यात आले होते. मेडिकल व दवाखाने वगळता सर्व व्यवहार कडकडीत बंद करण्यात आले होते.
विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने जप्त
शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाडसह परिसरात विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने पोलिसांकडून जप्त केली. कडक लॉकडाऊन सुरू असल्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर पोलिसांनी वाहने जप्त करून कारवाईचा बडगा उगारला.
भाजीपाला विक्रीवर परिणाम
कडक लॉकडाऊनमुळे पहिल्या दिवशी भाजीपाला विक्रीवर मोठा परिणाम झाला. सौदेदेखील बंद केले आहेत. पावसामुळे शेतकऱ्यांना फिरून भाजीपाला विक्री करता आली नाही. त्यामुळे नुकसानीलादेखील सामोरे जावे लागले. तर नांदणी येथून मुंबईला पाठविण्यात येणाऱ्या भाजीपाल्यामध्ये वाढ झाली आहे. दररोज तीन ते चार वाहने जातात. रविवारी सहा वाहनांतून भाजीपाला पाठविण्यात आला.
फोटो - १६०५२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - जयसिंगपूर येथील क्रांती चौकात रविवारी कडक लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी शुकशुकाट जाणवत होता.
(छाया-अजित चौगुले, उदगाव)