कुडाळ : कुडाळातील आमदार वैभव नाईक चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशीच्या सामन्यात मुंबई व इचलकरंजीच्या संघांनी स्पर्धेत घोडदौड सुरू केली असून राज्यस्तरीय खेळाडूंचे सामने पाहण्यासाठी क्रीडावासियांनी गर्दी केली होती. कुडाळ नवीन एसटी डेपो मैदानावर रविवारपासून आमदार वैभव नाईक चषक कबड्डी स्पर्धेची सुरुवात झाली आहे. ही स्पर्धा तीन दिवस चालणार असून पहिल्या दिवशी पाच सामने झाले. पहिल्या सामना बंड्या मारुती मुंंबई संघाविरुध्द इस्लामपूर सांगली असा झाला. यामध्ये बंड्या मारुती संघ विजयी झाला. दुसऱ्या जयहिंद इचलकरंजी विरुध्द विजय क्लब, मुंबई या सामन्यात इचलकरंजी संघ सहा गुणांनी विजयी झाला. अंबिका मुंबई विरुध्द एसडीके कुडाळ या सामन्यात अंबिका मुंबई संघ ४ गुणांनी विजयी झाला. चौथा सामना गुडमॉर्निंग मुंबई विरुध्द शिवभवानी सावंतवाडी यांच्यात झाला. या सामन्यात मुंबई संघ विजयी झाला. तर शिवभवानी सावंतवाडी विरुध्द नम्रता रत्नागिरी या सामन्यात नम्रता रत्नागिरी संघाने २५ गुणांनी विजय मिळविला. या स्पर्धेला राज्यस्तरीय पंच लाभले होेते. जवळपास सर्वच लढती या अटीतटीच्या झाल्याने क्रीडा रसिकांना कबड्डी खेळाचा मनमुराद आनंद लुटता आला. (प्रतिनिधी)
राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला प्रतिसाद
By admin | Updated: April 7, 2015 01:27 IST