गेल्या आठ दिवसांपासून शहरात फेरीवाले विरुद्ध महापालिका प्रशासन असा संघर्ष निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. बैठकीत फेरीवाले कृती समितीचे पदाधिकारी पालिकेच्या कारवाईवरून संतप्त झाले होते. फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी झालेली नाही, फेरीवाल्यांनी कोठे बसायचे, फेरीवाला झोन कोणते हेच ठरले नाही तर मग कारवाई कसली करता? असा सवाल आर. के. पोवार यांनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना विचारला.
फेरीवाला धोरणाची अंमलबजावणीस सहकार्य मिळत नाही. समिती स्थापन होत नाही, नॉमिनेशन येत नाहीत, अशी तक्रारी प्रशासक बलकवडे यांनी केली. आम्हाला फेरीवाल्यांना काढून टाकायचे नाही, तर आहे त्याच ठिकाणी परंतु एका शिस्तेने बसवायचे आहे, असे त्यांना स्पष्ट केेले. सर्वेक्षणाचे काम बरेच वर्षे फेरीवाल्यांमुळे रखडल्याची तक्रार शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी केली.
दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर ग्राम विकास मंत्री मुश्रीफ यांनी आर. के. पोवार यांच्यासमवेत ताराबाई रोड व महाद्वाररोडवर जाऊन संयुक्त पाहणी करा, पट्टे मारून घ्या. समन्वयातून मार्ग काढा असे सांगितले. बैठकीस आमदार चंद्रकांत जाधव, दिलीप पवार, महंमद शरिफ शेख, रघुनाथ कांबळे, अशोक भंडारे, राजू जाधव, किशोर घाडगे उपस्थित होते.
-१०० मीटर? की २५ मीटर?
मंदिरापासून शंभर मीटर अंतरात फेरीवाल्यांना बसू देऊ नका असा न्यायालयाचा आदेश आहे, तरीही हे अंतर पंचवीस मीटरपर्यंत कमी केले आहे, असे प्रशासकांनी सांगितले. तरीही गरुड मंडपापासून हे अंतर १२५ मीटर होत असल्याचे नंदकुमार वळंजू यांनी निदर्शनास आणून दिले.
-समितीच्या पत्राची बेदखल-
फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर लागलीच कृती समितीने प्रशासक बलकवडे यांना पत्र पाठवून चर्चेला वेळ द्या, एकत्र बसून निर्णय घेऊया, आम्हाला महापालिकेला सहकार्य करायचे आहे, असे सांगितले होते; परंतु पत्राची दहा-बारा दिवस दखलच घेतली नाही, अशी तक्रार आर. के. पोवार व नंदकुमार वळंजू यांनी केली. तेव्हा खुलासा करताना बलकवडे यांनी कारवाई झाल्या, त्या दिवशी सायंकाळी चर्चेला या असा निरोप देऊनही कोणी आले नसल्याचे सांगितले.
-मोठ्या माशांवर कारवाई करा-
शहरात अनेक ठिकाणी मोठे मासे रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करतात त्यांच्यावर आधी कारवाई करा, असे आर. के. पोवार म्हणतात. मंत्री मुश्रीफ यांनी मोठे मासे कोण, त्यांचे नाव सांगा असा आग्रह धरला. त्यावेळी प्रशासनाला ते माहीत असल्याचे पोवार म्हणाले.