लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पंढरपूर, शिर्डी, तुळजापूर येथील मंदिरांप्रमाणे करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील तथाकथिक हक्कदार पुजारी हटवावेत, बहुजन समाजातील लायक, चारित्र्यसंपन्न, निर्व्यसनी, सुशिक्षित पुजाऱ्यांची पगारी नोकर म्हणून नेमणूक करावी, अशा स्वरूपाचा ठराव महानगरपालिकेच्या येत्या सर्वसाधारण सभेत करावा आणि तो शासनाकडे पाठवावा, असे विनंतीवजा आवाहन बुधवारी श्री करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ संघर्ष समितीच्यावतीने महापौर हसिना फरास व इतर पदाधिकाऱ्यांना करण्यात आले. पुजारी हटाओ संघर्ष समितीचे शिष्टमंडळ माजी महापौर आर. के. पोवार यांच्या नेतृत्वाखाली महापौर हसिना फरास यांना बुधवारी महानगरपालिकेत भेटले. यावेळी उपमहापौर अर्जुन माने, स्थायी सभापती संदीप नेजदार, सभागृह नेता प्रवीण लिमकर, काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, राष्ट्रवादीचे गटनेते सुनील पाटील, आदी उपस्थित होते. अंबाबाईची वेशभूषा परंपरेप्रमाणे काठापदराची साडी हे वस्त्रच कायम असले पाहिजे, असा उल्लेख महानगरपालिकेच्या ठरावात करण्यात यावा, अशी सूचना यावेळी करण्यात आली. राजर्षी शाहू महाराज यांचे वटहुकूम व सनद आज्ञापत्रे हे तथाकथित आहेत, असे लेखी पत्रक काढून शाहू महाराजांचा अवमान करणाऱ्या करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांचा कडक शब्दांत निषेध करावा, अशीही मागणी करण्यात आली. ‘अंबाबाई’च्या नावाने मंदिरातील पुजारी व्यवसाय करत आहेत. प्रत्येक वर्षी कोट्यवधींची उलाढाल त्यांच्याकडून होत आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासन अन्य व्यावसायिकांना जसा कर आकारते, तसाच तो या पुजाऱ्यांवर देखील आकारावा, अशी सूचना डॉ. सुभाष देसाई यांनी केली. यावेळी दिलीप देसाई यांनी निवेदनाचे वाचन केले. शिष्टमंडळात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू लाटकर, दिलीप पाटील, किशोर घाडगे, बाबा पार्टे, महादेव पाटील, चारूलता चव्हाण, जयश्री चव्हाण, वैशाली महाडिक यांचा समावेश होता. महापौरांच्या प्रभागाचे नाव बदलामहापौर हसिना फरास यांच्या प्रभागाचे नाव ‘महालक्ष्मी प्रभाग’ असे आहे. महापौरांनी त्यात पुढाकार घेऊन त्यांच्या प्रभागाचे नाव बदलावे आणि ‘अंबाबाई प्रभाग’ असे नामकरण करावे, असे आवाहन सचिन तोडकर यांनी केले. ‘अंबाबाई’ असे नामकरण करण्याची सुरुवात प्रथम नागरिक असलेल्या महापौरांपासून झाली पाहिजे. जनतेच्या भावना तीव्र असल्याने महापौरांनी तातडीने निर्णय घ्यावा. एकमुखी ठराव करावा, असे आर. के. पोवार म्हणाले.
‘पुजारी हटाओ’चा ठराव करावा
By admin | Updated: July 13, 2017 00:17 IST