सावंतवाडी : लोकसभा निवडणुकीमधील नीलेश राणे यांच्या पराभवामुळे जन्मभूमीतच माझा पराभव झाला आहे. विकास कामे करूनही अनोळखी व्यक्तीला दीड लाखाच्या फरकाने लोकांनी निवडून दिले आहे. हायकमांडनेही मुख्यमंत्री करण्याचे दिलेले आश्वासन पाळलेले नाही. त्यामुळे पूर्ण विचार करुनच मंत्रिपदाचा राजीनामा सोमवारी देणार असल्याचे नारायण राणे यांनी जाहीर सभेत सांगितले. तसेच लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्याबाबत राणे यांनी जनतेचे आभारही मानले. यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, विकास सावंत, अशोक सावंत, चंदू राणे, संदेश पारकर, वसंत केसरकर, संजय पडते, दत्ता सामंत, संदीप कुडतरकर, मिलिंद कुलकर्णी, बाळा गावडे, संजू परब आदी उपस्थित होते. राणे म्हणाले, राजीनामा देण्याचा निर्णय संपूर्ण विचार करूनच घेतला आहे. राजीनाम्यामुळे पक्षाचे आणि कार्यकर्त्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेऊनच राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे. २००५ साली काँग्रेसमध्ये आल्यानंतर ९ वर्षे प्रामाणिकपणे काम केले. निष्ठेमध्ये संशय यावा, असे कोणतेही काम केले नाही. मात्र, मी हायकमांडवर नाराज आहे. गेल्या २५ वर्षात सात निवडणुका जिंकल्या. परंतु यावेळी मुलाचा पराभव झाल्याचे कानावर पडताच राजीनामा दिला होता. मात्र, यातून काही मार्ग काढू, असे आश्वासन देऊन मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला नाही. परंतु ते आश्वासन अद्यापही पाळले नाही, असे राणे यांनी स्पष्ट केले. केसरकर, उध्दव ठाकरेंवर टीकादहशत संपविणार, असे म्हणणारे आमदार केसरकर ताठ मानेने उभे राहून माझ्या नजरेला नजर भिडवू शकत नाहीत. मग दहशत काय संपविणार, असा कडक हल्लाबोल राणेंनी केसरकरांवर केला. तसेच उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करताना, ‘मातोश्री’ वर राहून निवडणुका जिंकता येत नाहीत, हे उध्दव ठाकरेंना माहीत आहे काय, शेतकरी, मच्छीमार यांचे जीवन कसे असते, याची माहिती आहे का, फयान वादळ आले, तेव्हा तो कोठे होता, ‘मातोश्री’वर उभा राहून विकासाच्या गप्पा मारणाऱ्या उध्दवचा निवडणुका आल्यानंतर भाषणबाजी करणे हाच विकास आहे, असा घणाघात राणे यांनी केला. (वार्ताहर) -- ज्याचे कार्य शून्य आहे, ज्याला कोणतीही पार्श्वभूमी नाही, त्या विनायक राऊतला लोकांनी दीड लाखांच्या मताधिक्याने निवडून दिले. विकासकामे दुसऱ्याने करायची आणि निवडून अनोळखी माणसाला द्यायचे, हाच जनतेचा न्याय का, असा प्रश्न करून यासाठीच राजीनामा देणार असल्याचे राणेंनी सांगितले. भाजपच्या संपर्कात असल्याची केवळ अफवा आहे. माझ्यावरचे कोकणच्या माणसाचे प्रेम कधीही कमी होणार नाही. मी कदापी हरणार नाही, असे नारायण राणे यांनी स्पष्ट केले.
पूर्ण विचार करुनच राजीनाम्याचा निर्णय
By admin | Updated: July 20, 2014 22:18 IST