* प्रयोगशाळा उभारली जाणार
संदीप बावचे
शिरोळ : अतिवृष्टी व महापुरामुळे शेतीपुढील अनेक पर्याय पुढे येऊ लागले आहेत. वारंवार महापूर येत असेल तर नदीबुड क्षेत्रात पर्यायी पीक कोणते करता येईल, शिवाय तग धरणाऱ्या नव्या ऊस पिकाचे बियाणे तयार करून आगामी काळात जर महापूर परिस्थिती निर्माण झाली तर त्या महापूर स्थितीतही ऊस पीक चांगले राहण्यासाठी काय करता येईल, यासाठी शिरोळच्या दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.
गेल्या अठरा वर्षांत चार वेळा महापुराने शिरोळ तालुक्यातील पिकांची मोठी हानी केली. न भरून येणारे नुकसान झाल्याने शेतकरी पुरता अस्वस्थ झाला. ऊस, सोयाबीन, भुईमूग यासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले. महापुरामुळे जमिनीतील जीवाणू मरून गेले आहेत. त्याचे पुन्हा संवर्धन करणे शिवाय पीकवाढीवर होणारे परिणाम शेतकऱ्यांना सहन करावे लागणार आहेत. वारंवार येणाऱ्या महापुरामुळे नदीबुड क्षेत्रातील पिकाला पर्यायी पीक कोणते करता येईल, यासाठी ‘दत्त’चे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. दत्तच्या माध्यमातून वेगळा प्रयोग राबविला जाणार आहे. यासाठी तालुक्यातील काही भागांची पाहणी करण्यात आली. महापुरामुळे ऊस पिकाचेच मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, ही बाब पुढे आली आहे. दहा ते पंधरा दिवस उसात महापुराचे पाणी राहिले तर त्यातूनही उत्पन्न कसे घेता येईल, यावर संशोधन केले जाणार आहे. पाहणी दरम्यान, आंबा, पेरू, चिकू ही झाडे पुराच्या पाण्यात चांगली राहिल्याचे दिसून आले आहे. यावर संशोधन करण्यासाठी मोठी प्रयोगशाळा उभारली जाणार आहे. दत्तकडून जीवाणू देखील तयार करून कमी दरामध्ये ते शेतकऱ्यांना देण्यासाठी देखील नियोजन केले जाणार आहे. यासाठी शास्त्रज्ञ व संशोधक यांची मदत घेतली जाणार आहे.
--------------
कोट -
शेतकऱ्यांच्या हितासाठी हा प्रयोग हाती घेतला आहे. शेतकरी आर्थिक समृद्ध झाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. महापुरात जमीन आणि पीक बुडाले तरी ऊस आणि फळपीक घेता येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- गणपतराव पाटील, अध्यक्ष दत्त कारखाना
फोटो - १२०९२०२१-जेएवाय-०४-गणपतराव पाटील