चंदगड : शिवसेना म्हणजे महासागर असून, या पक्षाकडे चंदगड तालुका वेगळ्या भावनेतून पाहतो आहे. चंदगड हा निसर्गाने नटलेला तालुका आहे. त्यामुळे तालुक्याला नको असलेला एव्हीएच प्रकल्प हद्दपार होईल. त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणी झाली आहे. यापुढे चंदगडच्या कोणत्याही प्रश्नावर बोलण्यासाठी आपला प्रतिनिधी हवा यासाठी शिवसेनेचा भगवा विचार समाजात रुजवा, असे प्रतिपादन शिवसेना कोल्हापूर संपर्कप्रमुख अरुणभाई दूधवडकर यांनी केले.चंदगड येथील शिवसेनेच्या संपर्क कार्यालय उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी स्वागत तालुका प्रमुख डॉ. संजय पाटील यांनी करून शिवसेनेच्या कार्याचा आढावा घेतला.दूधवडकर म्हणाले, चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यांच्या विकासाची ग्रामीण विकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी जबाबदारी घेतली असून, त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. चंदगड तालुक्यात गाव तेथे रस्ते ही भूमिका शिवसेनेची असल्याने एकही रस्ता विकासाविना राहणार नसल्याचे सांगितले.जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी एव्हीएच बंद व्हावा व दौलत सुरू व्हावा ही तालुक्यातील जनतेची भावना आहे. निरी कमिटी एव्हीएच बाबतीत कोणताही अहवाल देऊ दे. आमचे शिवसैनिक एव्हीएच हद्दपार केल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत.संग्राम कुपेकर म्हणाले, ५०० कोटींची दौलतची मालमत्ता फक्त ६२ कोटी रुपयांना विकण्याचा राष्ट्रवादीचा कुटील डाव आहे. दौलत शेतकऱ्यांची रहावी ही शिवसैनिकांची भूमिका आहे. संपर्क कार्यालयातून सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत म्हणून दर सोमवार व गुरुवार आपण स्वत: हजर राहणार असल्याचे सांगितले.यावेळी प्रा. सुनील शिंत्रे, युवा नेते प्रभाकर खांडेकर, भरमाणा गावडा, दिवाकर पाटील, सुषमा चव्हाण, माजी सरपंच अरुण पाटील, जयवंतराव देसाई, विजयराव देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास भैया कुपेकर, बाळासाहेब कुपेकर, शांता जाधव, प्रमोद कांबळे, राजू रेडेकर, कृष्णराव वार्इंगडे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. सदानंद गावडे यांनी सूत्रसंचालन केले. तालुकाप्रमुख महादेव गावडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
चंदगडचे प्रश्न मांडणारा शिवसेनेचा प्रतिनिधी हवा
By admin | Updated: August 17, 2015 00:28 IST