कोल्हापूर : विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम् यांनी मागील महिन्यात क्रीडा संकुलास भेट दिली. यावेळी केलेल्या पाहणीमध्ये फुटबॉल मैदान, ४०० मीटर धावनपट्टी याच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केली होती. त्यात केलेल्या कामाचा दर्जा तपासणीबाबत समिती स्थापन करून त्याचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे हा अहवाल येत्या १५ दिवसांत आयुक्तांना सादर केला जाणार असल्याची माहिती क्रीडा उपसंचालक एन. बी. मोटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ विविध कारणांनी रखडलेल्या विभागीय क्रीडा संकुलाचे उद्घाटन ५ मार्च २०१५ रोजी होळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी संकुलाच्या ठेकेदारास काम ५ मार्चपूर्वी झाले नाही तर क डक कारवाई करू, असे सुनावले होते.ठेकेदाराने ५ मार्चपूर्वीच हे काम पूर्णही केले. त्यात फुटबॉल, ४०० मीटर धावनपट्टी, बास्केटबॉल, शूटिंग रेंज, जलतरण तलाव, कबड्डी मैदान, खो-खो ही मैदाने तयार करण्यात आली. मात्र, काम घाईत उरकण्याच्या प्रयत्नात ठेकेदाराने फुटबॉल मैदान व ४०० मीटर धावनपट्टी तयार करताना याबाबत यातील तज्ज्ञांचा सल्ला घेणे क्रमप्राप्त होते पण त्यांनी ते केलेच नाही. ही बाब संकुलाचे काम कसे झाले हे पाहणी करताना विभागीय आयुक्त चोक्कलिंगम् यांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी व क्रीडा उपसंचालकांना कामाच्या दर्जाबाबत तज्ज्ञांच्या समितीमार्फत तपासणी केली काय, असा सवाल विचारला. यावर संबंधितांना उत्तर देता आले नाही. त्यामुळे चोक्कलिंगम् यांनी तत्काळ समिती स्थापन करून मला सर्वच कामाचा अहवाल द्या, असे आदेश दिले. आता क्रीडा कार्यालय या खेळांशी संबंधित ज्येष्ठ खेळाडू, ज्येष्ठ मार्गदर्शक, क्रीडा संघटक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अशा तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाणार आहे. त्यानुसार या समितीचा अहवाल येत्या पंधरा दिवसांत विभागीय आयुक्तांना सादर केला जाणार असल्याची माहिती क्रीडा उपसंचालक मोटे यांनी दिली. या अहवालात त्रुटी आढळल्यास संबंधितांवर काय कारवाई होते की, नव्याने मैदानांची दुरुस्ती केली जाणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
पंधरा दिवसांत आयुक्तांना अहवाल देणार
By admin | Updated: July 2, 2015 00:22 IST