कोल्हापूर : पेन्शनरांची बँकांकडून गैरसोय केली जात असेल तर अशा बँकांची नावे कळवावीत. त्या सर्व बँकांच्या प्रतिनिधींना योग्य त्या सूचना तत्काळ देऊ, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी गुरुवारी येथे दिली.जिल्हा कोषागार कार्यालयातर्फे पेन्शनरांसाठी ‘पेन्शन अदालत व विमाछत्र योजना’ या उपक्रमाद्वारे पेन्शनरांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कोल्हापूर सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आर. के. जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी जी. डी. देशपांडे, कोषागार अधिकारी आर. वाय. लिधडे, अप्पर कोषागार अधिकारी व. कृ. परिट, आयकर निरीक्षक प्रगंधा पिसाळ, चार्टर्ड अकौंटंट शरद पेंडसे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पेन्शनरांनी विविध तक्रारी मांडल्या. त्या ऐकून घेत जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी योग्य ते कार्यवाहीचे आश्वासन दिले.जिल्हाधिकारी सैनी म्हणाले, बँकांकडून गैरसोय होत असल्यास अशा बँकांची नावे आपल्याला कळवावीत. त्या सर्व बँकांच्या प्रतिनिधींना योग्य त्या सूचना तत्काळ देऊ. त्याचबरोबर सर्व निवृत्तिवेतनधारकांची ज्येष्ठ नागरिक ओळखपत्रे घेऊन शासनाच्या सुविधांचा लाभ व्हावा. यासाठी संघटनेने सर्व तहसीलदार कार्यालयांशी संपर्क साधावा, जेणेकरून त्यांना सुविधा पुरविता येतील. आर. के. जाधव म्हणाले, कोषागार कार्यालयातून सेवा चांगली मिळते पण पेन्शन जमा होणाऱ्या बँकांकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही. त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करून पेन्शनरांना सन्मानाची वागणूक मिळावी. कोषागार अधिकारी आर. वाय. लिधडे यांनी कोषागार कार्यालयातून निवृत्तिवेतनधारकांना नियमित वेतन देण्याची कार्यवाही केली जाते तरी निवृत्तिवेतनधारकांच्या शंका व अडचणी सोडविण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला आहेयावेळी उपकोषागार अधिकारी प्रदीप डवरी, उपकोषागार अधिकारी गीता बिदनूर यांच्यासह अधिकारी व पेन्शनर मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)पेन्शनरांच्या मागण्या८० वर्षांवरील १० टक्के वाढीव लाभ त्वरित मिळावाहयातीचा दाखला देताना आजारी पेन्शनरांची खूप अडचण होते, तरी बँकांनी यासाठी सहकार्य करावे.ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे सन्मानाची वागणूक मिळावी.पेन्शनरांसाठी बँकेत स्वतंत्र व्यवस्था करावी.
पेन्शनरांची गैरसोय करणाऱ्या बँकांची नावे कळवा
By admin | Updated: October 30, 2015 23:09 IST