लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महानगरपालिका उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी सोमवारी सावित्रीबाई फुले व पंचगंगा रुग्णालयातील प्रसूती विभागास अचानक भेट देऊन तेथील पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रसूती विभागातील सुविधांचा आढावा घेतला.
या रुग्णालयात दाखल झालेल्या गरोदर व प्रसूत मातांना महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने दूध, नाश्ता व दोन वेळचे जेवण मोफत दिले जाते. यावेळी मंजूर ठेकेदाराकडून नाश्ता व जेवण दर्जेदार दिले जाते का नाही, याची त्यांनी शहानिशा केली.
दरेकर यांनी रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या वॉर्डाचीही पाहणी केली. या वॉर्डामधील फरशा फुटलेल्या आहेत. त्या तात्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना संबंधित अभियंत्यांना दिल्या. या फरशा ज्या ठेकेदारामार्फत बसविल्या आल्या आहेत त्याची माहिती घेऊन त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजूश्री रोहिदास यांनी रुग्णालयामधील प्रसूतिगृहामधील कोरोना विषाणूबाबत व इतर सोयीसुविधा तसेच सावित्रीबाई फुले रुग्णालयात प्रसूत मातांची कोरोना विषाणू संसर्गाबाबतची घेतली जाणारी खबरदारीची माहिती दिली. यावेळी महिला व बालकल्याण अधीक्षक प्रीती घाटोळे, कनिष्ठ लिपिक शिवाजी आगलावे उपस्थित होते.