कोल्हापूर : शहरातील मंजूर रस्त्यांची कामे सुरू होण्यापूर्वी पाण्याचे जीर्ण झालेले पाईप संबंधित नळ कनेक्शनधारकांनी बदलून घ्यावेत, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
शहरा गावठाण भागातील नागरिकांची नळ कनेक्शन फार जुनी असून त्याचे पाईप गंजून जीर्ण झाले आहेत. त्यामुळे जीर्ण पाईप जमिनीमधील अन्य स्त्रोतांमधून वाहणारे दूषित पाणी मिसळून काही ठिकाणी दूषित पाण्याच्या तक्रारी येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये निश्चित दूषित पाण्याचे ठिकाण सापडणे अडचणीचे होऊन तक्रारीचे प्रमाण वाढत आहे. सध्या शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून डांबरी रस्त्यांची कामे सुरू आहेत. या रस्त्यांची कामे पूर्ण होण्यापूर्वी ज्या नळ कनेक्शनधारकांची नळ कनेक्शन जुनी आहेत. ज्यांच्या नळ कनेक्शनचे पाईप्स जीर्ण झाले आहेत. अशा सर्व नळ कनेक्शनधारकांनी जीर्ण झालेले पाईप बदलून घ्यावेत. एकदा डांबरी रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कोणतेही नळ कनेक्शन दुरूस्ती करीता रस्ता खुदाईस परवानगी दिली जाणार नाही, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने म्हटले आहे.