कोल्हापूर : क्रेनवरील कर्मचाऱ्यांना युनिफॉर्म आणि ओळखपत्र आजपासून बंधनकारक करू. वाहने उचलण्यापूर्वी क्रेनमधून माईकवरून सूचना दिल्या जातील आणि आजच सर्व क्रेनमालकांची बैठक बोलावून नागरिकांच्या तक्रारीबाबत त्यांना सूचना देऊ, असे आश्वासन शुक्रवारी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील यांनी कोल्हापूर जनशक्तीच्या शिष्टमंडळाला दिले.शहरात रोज सुमारे सहाशे वाहनांची भर पडत आहे. त्याचप्रमाणे श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक व पर्यटक म्हणून येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. यामुळे पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. वाहतूक शाखेकडून क्रेन व जॅमरचा वापर करून वाहनधारकांवर कारवाई करण्यात येत आहे. विशेषत: सीपीआर चौक, भाऊसिंगजी रोड, शिवाजी रोड, महाद्वार रोड, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, भवानी मंडप, मध्यवर्ती बसस्थानक, महालक्ष्मी चेंबर्स यासारख्या मध्यवर्ती ठिकाणी पार्किंगच्या कारणावरून दुचाकी उचलणे व चारचाकी वाहनांना जॅमर लावण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी सूचनाफलक नाहीत. ते गंजलेले व खराब झालेले आहेत. परिणामी वाहने पार्किंग करताना अडचणी निर्माण होत आहेत.सुभाष वोरा व समीर नदाफ यांनी, एखादे वाहन पार्किंगचे कारण सांगून क्रेनने उचलताना माईकवरून सूचना देणे गरजेचे आहे. संबंधिताने प्रतिसाद न दिल्यास गाडी जरूर उचलावी; परंतु अशा प्रकारची सूचना न देता वाहने उचलण्यामध्ये इतका रस का? असा प्रश्न केला. महापालिकेशी पत्रव्यवहार करून प्रथम पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्याव्यात. सर्वत्र सूचनाफलक लावावेत. वाहतूक शाखेने स्वमालकीच्या क्रेन घेण्यासाठी पोलीस प्रशासनाला प्रस्ताव द्यावा, आदी सूचना यावेळी केल्या.यावेळी ईश्वरप्रसाद तिवारी, अरुण अथणे, केशव स्वामी, अण्णा पिसाळ, विश्वास नाईक, तय्यब मोमीन, बाळासो शारबिद्रे, रियाज कागदी, संतोष आयरे, सागर निकम, रवी कुलकर्णी, रियाज कवठेकर, प्रभात सावंत, सागर आलासे, मन्सूर मोमीन, विवेक वोरा, नजीर गवंडी, तानाजी पोळ, आदी उपस्थित होते.
क्रेन, जॅमरबाबतच्या तक्रारी दूर करू
By admin | Updated: June 1, 2015 00:14 IST