कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत, अशी भीती घालून शहरातील मंदिरांवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे; परंतु शहरात अनेक ठिकाणी विविध प्रकारची अनधिकृत बांधकामे असताना त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी केवळ मंदिरांवरच कारवाई करायचा घाट घातला तर याद राखा, असा खणखणीत इशारा शिवसेनेने गुरुवारी महानगरपालिका प्रशासनाला दिला. महानगरपालिकेने दिलेल्या नोटिसांच्या विरोधात शिवसेनेने पालिके च्या मुख्य कार्यालयावर मोर्चा काढून घंटानाद व महाआरती केली. महानगरपालिका प्रशासनाने शहरातील अनधिकृत तसेच नियमित होऊ शकणाऱ्या मंदिर, प्रार्थनास्थळांची यादी नुकतीच प्रसिद्ध केली असून, त्यावर हरकती मागविल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. यासंबंधी काही कार्यकर्त्यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांना भेटून निवेदने दिली आहेत.गुरुवारी शिवसेनेच्यावतीने महानगरपालिका मुख्य कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते. ‘शिवालय’ या कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. महानगरपालिकेसमोर मोर्चा पोहोचताच शिवसैनिकांनी घंटानाद केला व महाआरती केली. यावेळी कारवाईच्या नोटीस काढल्याबद्दल घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला नंतर आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी आमदार क्षीरसागर यांनी शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे आहेत, त्यांच्यावर कारवाई करायची सोडून जर मंदिरांवर कारवाई करण्याचा प्रयत्न झाला तर याद राखा, असा इशारा दिला. समाजातील इतर धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर कारवाई करण्याचे न्यायालयाने निर्देश दिले त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्याकडे डोळेझाक करण्यात आली. न्यायालयाचे निर्देश धाब्यावर बसविण्यात आले, याकडेही क्षीरसागर यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले. आजच्या मोर्चाचे नेतृत्व आमदार क्षीरसागर, शिवसेना नगरसेवक नियाज खान, प्रतिज्ञा निल्ले, राहुल चव्हाण, अभिजित चव्हाण, शहरप्रमुख शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रज, जयवंत हारूगले, किशोर घाटगे, सुनील जाधव, तुकाराम साळोखे, धनाजी दळवी, पूजा भोर, शाहीन काझी, पूजा आमते, आदींनी केले.
मंदिरांना हात लावाल तर याद राखा
By admin | Updated: November 27, 2015 01:03 IST