कोल्हापूर : यंदाच्या नव्या फुटबाॅल हंगामासाठी संघ व खेळाडू नोंदणी लवकरच सुरू होणार आहे. हा फुटबाॅलप्रेमींना दिलासा देणारा निर्णय रविवारी के.एस.ए. फुटबाॅल समिती पदाधिकारी व खेळाडू, संघ यांच्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
गेल्या वर्षीचा फुटबाॅल हंगाम केवळ के.एस.ए.लीगसह चार स्पर्धा कशाबशा पार पडल्या. त्यानंतर जगभरात कोरोनाने थैमान घातले. त्यामुळे हा हंगाम महापौर चषक फुटबाॅल स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील सामन्यांमध्येच रखडला. त्यानंतर २०२०-२०२१ चा नवा हंगाम सुरू होत आहे. हाही हंगाम खेळाविनाच संपणार का अशी शंका फुटबाॅलप्रेमींना होती. मात्र, के.एस.ए.चे अध्यक्ष मालोजीराजे यांच्या विशेष प्रयत्नांतून रविवारी वरिष्ठ फुटबाॅल संघ व त्यांचे प्रतिनिधी आणि के.एस.ए. फुटबाॅल समिती पदाधिकारी यांच्यात बैठक झाली. यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्णयाप्रमाणे सर्व नियमावली पाळून पहिल्या टप्प्यात लवकरच फुटबाॅल संघ व खेळाडूंची नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतची तारीख लवकरच के.एस.ए.तर्फे जाहीर केली जाणार आहे. यावेळी के.एस.ए.चे सहसचिव राजेंद्र दळवी, फुटबाॅल सचिव प्रा. अमर सासने, नितीन जाधव, विश्वंभर मालेकर-कांबळे, संभाजीराव पाटील-मांगोरे, मनोज जाधव, दीपक राऊत यांच्यासह सर्व संघांचे प्रशिक्षक, पदाधिकारी उपस्थित होते.