कोल्हापूर : गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कोरोनासंबंधीची अँन्टिजन तपासणी करण्यास नकार देण्यात आला. तिथे तपासणीसाठी गेल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून उद्धट आणि उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. यामुळे कोरोना नियंत्रणासाठी चाचण्या वाढवण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आदेशालाच आरोग्य प्रशासनाकडून केराची टोपली दाखवली जात असल्याचे पुढे आले आहे.
गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात येतात. शंभर बेडचे हे रुग्णालय आहे. कोरोनाच्या महामारीमध्ये येथे २४ तास कोरोनासंबंधीची तपासणी करणारी यंत्रणा असणे आवश्यक आहे. पण येथे सध्या कर्मचाऱ्यांच्या वेळेनुसार तपासणी होत असल्याच्या तक्रारी आहेत. कार्यालयीन वेळेत आलेल्यांचीच तपासणी करणार अशी तेथील प्रशासनाची भूमिका आहे. पण खासगी डॉक्टरांनी कार्यालयीन वेळेनंतर अँटिजन व स्वॅब तपासणी करून घ्यावी, असा सल्ला दिलेल्यास उपजिल्हा रुग्णालयाची यंत्रणा आवारात थांबूही देत नाही.
सुरक्षा रक्षकाकरवी हाकलून लावले जाते. कोरोनाची चाचणी करून घेणाऱ्यांना अशा पद्धतीने वागणूक मिळत असल्याने आरोग्य सेवेबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कर्मचाऱ्यांच्या सोयीनुसार चाचणी होणार असेल तर सायंकाळी आणि रात्री उशिरा तपासणी करण्याची आवश्यकता असलेल्या संशयितांनी काय करायचे असाही प्रश्न उपस्थित होत आहे. यांची गैरसोय होत आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या अशा बेफिकीर कारभारामुळेच गडहिंग्लज जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचाही आरोप होत आहे.
कोट
थंडी, ताप आल्याने गडहिंग्लज येथील खासगी डॉक्टरकडे दाखवण्यासाठी गेलो. त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात अँटिजन करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी गेलो. तिथे तपासणीस नकार देण्यात आला.
शंकर देसाई, संशयित रुग्ण