कोल्हापूर : बेकरी पदार्थांसाठी लागणाऱ्या मैद्याला पाच टक्के, तर यापासून तयार होणाऱ्या पदार्थांसाठी १२ टक्के व्हॅट आहे. हा फरक का? या संदर्भात अर्थमंत्र्यांशी चर्चा करून निश्चितच व्हॅट कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी येथे दिली. राज्य सरकार या व्यवसायाच्या मागे ठामपणे उभा राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला. लक्ष्मीपुरी येथील बेकर्स भवन परिसरात आयोजित कोल्हापूर जिल्हा बेकर्स ग्राहक सहकारी संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी दै. पुढारीचे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी महापौर अश्विनी रामाणे, आमदार सतेज पाटील, माजी आमदार हाफीज धत्तुरे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, महेश जाधव, नगरसेवक निलोफर आजरेकर, संघाचे अध्यक्ष महंमद शेख आदी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, बेकरीचे पदार्थ हे एकमेव पदार्थ आहेत की, जे अद्यापही आपल्या घरातून हद्दपार झालेले नाहीत. याउलट यामध्ये अनेक व्हरायटी वाढत गेल्या आहेत. या व्यवसायात अत्याधुनिक व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे. सरकारच्या माध्यमातून या व्यवसायाला पाठबळ देऊ. मैद्याला पाच टक्के, तर यापासून तयार होणाऱ्या बेकरी पदार्थांसाठी १२ टक्के व्हॅट आहे. हा फरक का याबाबत अर्थमंत्र्यांशी चर्चा करू. येत्या सहा महिन्यांत ‘जीएसटी’ आल्यावर सर्वच कर बदलणार आहेत. त्यामुळे सध्या तात्पुरत्या स्वरूपात व्हॅट कमी करण्यासाठी अर्थमंत्र्यांशी चर्चा करु. आमदार सतेज पाटील म्हणाले, सध्या बेकरी व्यवसाय हा खाद्य उद्योगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. पूर्वी हाताने तयार होणारे पदार्थ आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार केले जात आहेत. सरकारसह सर्वांनीच ‘एफडीआय’च्या माध्यमातून परदेशी गुंतवणूक मान्य केली आहे. त्यामुळे या व्यावसायिकांकरिता रिटेल धोरणासाठी राज्य सरकारने पाठिंबा द्यावा. संस्थेच्या ५० वर्षांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या ‘सुवर्ण भरारी’ या स्मरणिकेचेही प्रकाशन झाले. संचालक राजाराम खाडे यांनी स्वागत केले. अध्यक्ष महंमद शेख यांनी प्रास्ताविक केले. यावेळी महादेव साळोखे, राजाराम खाडे, मोतीराम नरसिंगानी, विनायक क्षीरसागर, आनंदराव पायमल, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
बेकरी पदार्थांवरील ‘व्हॅट’ कमी करणार
By admin | Updated: March 20, 2016 02:13 IST