चंदगड : ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील सर्पोद्यानची ‘झू अथॉरिटी ऑफ इंडिया’ने रद्द केलेली मान्यता नियम व अटींची पूर्तता करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. दोन वेळा मान्यता रद्द झाल्यामुळे याविषयी उत्सुकता होती. शेतकरी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व सर्पालय कार्याध्यक्ष तानाजी वाघमारे यांच्या प्रयत्नांमुळे हे यश मिळाले असून, सर्पप्रेमींमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
डॉ. सोनाली घोष डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ फॉरेस्ट नवी दिल्ली यांच्या पत्रास अनुसरून एस. एन. माळी, मुख्य वनसंरक्षक तथा सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य प्राणी संग्रहालय प्राधिकरण नागपूर यांचे पत्र नुकतेच प्राप्त झाल्याची माहिती तानाजी वाघमारे यांनी दिली. सर्पोद्यानची स्थापना कै. बाबूराव टक्केकर यांनी १९६६ मध्ये केली. मात्र, १९७२ मध्ये अस्तित्वात आलेल्या वन्यजीव संरक्षण कायद्याचा आधार घेत हे सर्पोद्यान अटींची पूर्तता करीत नसल्याच्या कारणास्तव केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या आदेशास अनुसरून महाराष्ट्र राज्य प्राणी संग्रहालय प्राधिकरण व केंद्रीय चिडियाघर प्राधिकरण (सेंट्रल झू) यांनी २० नोव्हेंबर २०२० च्या पत्राने दुसऱ्यांदा मान्यता रद्द केली होती. त्यानंतर तानाजी वाघमारे यांची सर्पोद्यानची मान्यता पुन्हा मिळविण्यासह अटींच्या पूर्ततेसाठी धडपड सुरू आहे.
याला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, जलसंपदामंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, संजय मंडलिक, धैर्यशील माने, खा. संभाजीराजे, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार विनोद रणवरे, आदींनी सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी प्रत्यक्षात कार्यवाही होणे गरजेचे आहे.
पदरमोड करून टक्केकर कुटुंबीयांनी पाच दशके जतन केलेल्या सर्पालयाची प्रचलित नियम व अटींच्या पूर्ततेसाठी शासन स्तरावरून बळकटी मिळाल्यास हे ठिकाण अभ्यास व संशोधन केंद्रासह आगळेवेगळे पर्यटन केंद्र म्हणूनही जगाच्या नकाशावर झळकण्यास वेळ लागणार नाही.