कोल्हापूर : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतील कच्च्या दुव्यांच्या आधारेच अनेकांनी दुकानदारी थाटल्याची कबुली योजनेचे जिल्हा समन्वयक अशोक देठे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ‘फोनवरून ढीगभर तक्रारी करणारे प्रत्यक्षात कारवाईसाठी लेखी तक्रार देताना कचरतात’, अशी खंतही देठे यांनी बोलून दाखविली. योजना पारदर्शी राबविण्यासाठी तक्रारदारांनी पुढे येण्याचे धाडस दाखवावे, असे आवाहनही देठे यांनी केले आहे.जीवनदायी आरोग्य योजनेतील खाबुगिरीवर ‘लोकमत’ने तीन भागांच्या मालिकेद्वारे प्रकाश टाकला. योजनेचा मूळ उद्देश, योजनेतील लाभार्थींना ‘आरोग्यमित्र’ हा घटकच कशा प्रकारे वैद्यकीय दुकानदारीकडे झोकून देतो, याची माहिती या मालिकेच्या माध्यमातून समोर आली. नव्याने सुरू झालेल्या या दुकानदारीकडे अनेकांचे लक्ष वेधले. परिणामी योजना सक्षम राबविण्याची जबाबदारी असलेल्या समन्वयक, अधिकारी व ‘एमडी इंडिया’ या संस्थेने दखल घेत तक्रारदारांना पुढे येण्याची विनंती केली.देठे म्हणाले, जीवनदायी योजनेच्या कार्यालयात किंवा फोनद्वारे तक्रारदारांनी तक्रार द्यावी. याची गंभीर दखल घेऊ. नियमांवर बोट ठेवत, आरोग्यमित्र किंवा दवाखान्यास जाब विचारावा. रुग्णांच्या मदतीसाठी आम्ही आहोतच. दवाखाना व्यवस्थापकांनी आगाऊ पैसे मागितल्याचा पुरावा मिळविण्याचा प्रयत्न रुग्णांच्या नातेवाइकांनी करावा. मोबाईलद्वारे संभाषण रेकॉर्ड केल्यास त्याचा दवाखाना किंवा संबंधितांवर कारवाई करताना उपयोग होईल. याचा विचार करून कृपया तक्र ारींसाठी पुढे या, असे आवाहन देठे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)कुठे कराल तक्रार : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनादुसरा मजला, प्रभाकर प्लाझा, दाभोळकर कॉर्नर, कोल्हापूर.यांच्याशी साधा संपर्क अशोक देठे (जिल्हा समन्वयक) मो. क्र.- ८२७५०९५८११अभिजित देठे (जिल्हाप्रमुख-एमडी इंडिया) - ८२७५०९५३५०डॉ. सुभाष नांगरे (जिल्हा वैद्यकीय अधिकारी) - ८२७५०९५३४०‘लोकमत’मुळे २५ हजार वाचले...राजारामपुरीतील एका दवाखान्यात नातेवाइकावर शस्त्रक्रियेसाठी दीड लाखांची मागणी केली होती. कागदपत्रांची व पुराव्याची मागणी करून जोर लावताच, २५ हजार भरण्याचा तगादा लावला. नातेवाइकांनीही दीड लाखाची शस्त्रक्रिया २५ हजारांत होते, म्हणून परस्पर पैसे भरले. ‘लोकमत’च्या जीवनदायी योजनेबाबत प्रसिद्ध बातम्यांच्या आधारे आरोग्यमित्राशी फोनवरून चर्चा केल्यानंतर २५ हजार परत देण्यासाठी ‘मॅडम’ला बोलतो असे सांगितले. ‘लोकमत’मुळेच पैसे मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. - विजय देसावळे (शिक्षक)
प्रत्यक्ष तक्रारदार अल्पच!-‘जीवनदायी’ नव्हे..... वेदनादायी -‘लोकमत’मुळे २५ हजार वाचले...
By admin | Updated: August 28, 2014 00:10 IST