इचलकरंजी : महाविकास आघाडीने शेतकरी व कष्टकर्यांच्या हिताची अनेक विकासकामे केली आहेत. ते मांडण्यासाठी कुठेही व कोणत्याही व्यासपीठावर एकत्र येण्याची तयारी असल्याचे प्रतिआव्हान आमदार प्रकाश आवाडे यांच्या उपस्थितीत एका जाहीर कार्यक्रमात शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार धैर्यशील माने यांनी दिले.
कोरोना काळात शासनाकडून मदतीची अपेक्षा होती. केंद्र शासनाने मदत केली. मात्र, राज्य शासनाने एक पैचीही मदत केली नाही, असा जाहीर आरोप आमदार आवाडे यांनी शुक्रवारी (दि. ११) एका जाहीर कार्यक्रमात केला होता. त्याची पुनरावृत्ती करत शनिवारी एका जाहीर कार्यक्रमात आवाडे यांनी या तीन पक्षांच्या सरकारने काहीही मदत केली नसल्याचा आरोप केला. तो धागा पकडत खासदार माने यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र येऊन राज्यात एक वर्ष यशस्वीपणे पूर्ण केले आहे. या काळात अनेक विकासकामे केली असून, ती जनतेसमोर मांडण्यासाठी केव्हाही आणि कुठेही येण्यास तयार असल्याचे स्पष्ट करत आवाडे यांच्या आव्हानाला प्रतिआव्हान दिले. त्यामुळे आता जागा कोण आणि कधी ठरवणार की फक्त ‘बोलाची कडी आणि बोलाचाच भात’ याची उक्ती येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.