वेंगुर्ले : पालकमंत्री नारायण राणे यांच्या स्वागतासाठी शहरात लावण्यात आलेल्या बॅनरपैकी १२ बॅनर शनिवारी रात्री अज्ञातांनी फाडल्याची तक्रार रविवारी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनीष दळवी यांनी वेंगुर्ले पोलिसात दिली आहे. या बॅनर फाडण्याच्या प्रकारामुळे वेंगुर्ले पोलीस स्थानकात आज सकाळपासून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले व पोलीस निरीक्षकांना घेराव घातला.नारायण राणे यांचा शनिवारी वेंगुर्ले शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. त्यानिमित्ताने शहरात ठिकठिकाणी नारायण राणे यांच्या स्वागतासाठी शहरात डीजीटल बॅनर लावले होते. त्यापैकी १२ बॅनर शनिवारी रात्री १२.१५ वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी फाडल्याची तक्रार दळवी यांनी वेंगुर्ले पोलिसात दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.मात्र, रविवारी सकाळपासून सुमारे ४० ते ५० कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानकात बॅनर फाडणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करा, अशी मागणी करीत ठिय्या आंदोलन सुरू केले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत वाट पाहूनही पोलिसांकडून कोणतीच कारवाई करण्यात न आल्याने कार्यकर्त्यानी पोलीस निरीक्षक रतनसिंग रजपूत यांना घेराव घालून जाब विचारला. याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत काँग्रेस कार्यकर्ते पोलीस स्थानकात ठाण मांडून बसले होते.वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीत ठिकठिकाणी विद्युत व दूरध्वनी खांबावर विविध राजकीय पक्षांचे बॅनर लटकवण्यात आल्याने अपघाताची शक्यता आहे. असे बॅनर नगरपरिषदेने तत्काळ काढून टाकावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.वेंगुर्ले शहरात वेंगर्ले हॉस्पिटल नाका, मारूती मंदिर, बाजारपेठ, दाभोली नाका, पीराचा दर्गा आदी ठिकाणी नगरपरिषदेची परवानगी न घेता लावण्यात आलेल्या बॅनरमुळे वाहनचालकांना वळणाचा अंदाज न आल्याने यापूर्वी अनेकवेळा लहान- मोठे अपघात झालेले आहेत. नगरपरिषदेची परवानगी न घेता लावण्यात आलेल्या बॅनरमुळे शहरात अशांतता निर्माण होते. शनिवारी काँग्रेसचे तर यापूर्वी भाजपचे बॅनर शहरात फाडण्याचे प्रकार घडले होते. असे प्रकार घडू नयेत यासाठी नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने पावले उचलण्याची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)
राणेंच्या स्वागताचे बॅनर फाडले
By admin | Updated: July 20, 2014 22:14 IST