कोल्हापूर : रंकाळा टॉवर परिसरातील उद्यानात खेळण्याच्या कारणावरून लहान मुलांना लोखंडी गजाने मारहाण केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी सहा जणांना बुधवारी अटक केली. रणजित पांडुरंग मोरस्कर (वय ४१), आकाश रणजित मोरस्कर (वय २१), अजिंक्य राजेंद्र शिंदे (वय २४), राकेश आनंदा गांजे (वय २०), अभिजित आनंदा कांबळे (वय २८) आणि योगेश भाऊसाहेब सूर्यवंशी (वय ३२, सर्व रा. रंकाळा टॉवर परिसर, कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
रंकाळा टॉवर परिसरात उद्यानात खेळण्यासाठी जयदीप लाखनसिंग कलाणी (वय १५ रा. सीक गल्ली, विचारेमाळ) व त्याचे मित्र बुधवारी (दि. १८) सायंकाळी गेले होते. तेथे जंपिंग झुला खेळण्याचे दर ठरवण्यावरून मुलांचा झुलाचालकाशी वाद झाला. त्यावेळी संशयित आरोपी रणजित मोरस्कर, आकाश मोरस्कर, अजिंक्य शिंदे, राकेश गांजे, अभिजित कांबळे, योगेश सूर्यवंशी यांनी जयदीप कलाणी याच्यासह लहान मुलांना लोंखडी गज व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. या मारहाणीत जयदीप हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्या वडिलांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी सहा जणांना अटक केली.