कोल्हापूर : दोन वर्षे देशपातळीवरील शेतकऱ्यांचा असंतोष एकवटणारे खासदार राजू शेट्टी हातकणंगले व सांगली या घरच्या मतदारसंघांची जबाबदारी शिलेदारांवर सोपवून रविवार (दि. ७)पासून १५ दिवस महाराष्ट्राच्या प्रचार स्वारीवर निघत आहेत. पदयात्रा, कॉर्नर सभा, जाहीर सभांच्या माध्यमातून ते सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रचाराचे रान उठविणार आहेत. शेट्टी यांच्या जाहीर सभेची सुरुवात आज, शुक्रवारी वर्धा येथे राहुल गांधी यांच्या सभेतून होणार आहे.खासदार शेट्टी यांची प्रतिमा ‘देशपातळीवरील शेतकऱ्यांचा नेता’ अशी झाली असल्याने त्यांना प्रचारासाठी देशभरातून मागणी आहे. तथापि, त्यांनी सध्या महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविल्याने ‘स्वाभिमानी’कडून नियोजन तयार केले आहे. महाआघाडीतील ‘स्वाभिमानी’ एक घटकपक्ष आहे. शरद पवार यांच्या नियोजनानुसार सध्या महाआघाडीतील बड्या नेत्यांना ‘स्टार प्रचारक’ म्हणून सभांमध्ये उतरविले जात आहे. हातकणंगले ‘स्वाभिमानी’चा गड आहे; तर सांगलीत प्रथमच ‘स्वाभिमानी’ लढत आहे. या जागा ‘स्वाभिमानी’साठी महत्त्वाच्या आहेत; पण दोन मतदारसंघांत शेट्टींना अडकवून ठेवण्यापेक्षा त्यांच्या प्रतिमेचा उपयोग इतर शेतकरीबहुल मतदारसंघांत करून घेण्याचे महाआघाडीचे धोरण आहे.रविवारपासून २१ एप्रिलपर्यंत ते राज्यभरातील प्रचारसभा घेणार आहेत. हातकणंगले व सांगलीच्या प्रचाराची जबाबदारी शरद पवार, खासदार उदयनराजे, धनंजय मुंडे, पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली आहे. योगेंद्र यादव, रामपाल जाट, राकेश टिकैत, व्ही. के. सिंग,डॉ. सुनीलम हेसुद्धा प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष तूपकर यांनी दोन्ही मतदारसंघांत मुक्काम ठोकत जोडण्या लावण्याचे धोरण ठेवले आहे. त्यांना सावकर मादनाईक, जालंदर पाटील, भगवान काटे यांच्यासह विश्वासू शिलेदार मोलाची साथ देण्याचे काम करीत आहेत.राज ठाकरेंची सभा होणारराज ठाकरे यांनी ‘स्वाभिमानी’च्या सभेला येण्यासाठी होकार कळविला आहे. पहिल्या टप्प्यात १७ एप्रिलला मतदान होणाºया ठिकाणी त्यांच्या राज्यभरात नऊ जाहीर सभा होणार आहेत. दुसºया टप्प्यात १६ ते २१ एप्रिलदरम्यान हातकणंगले, सांगली, कोल्हापूरसाठी एकत्रित सभा घेण्याबाबत त्यांनी तयारी दर्शविली आहे. त्यांना तशा तारखा कळविल्या असून, त्यातून एक तारीख ते लवकरच सांगणार असल्याचे ‘स्वाभिमानी’च्या सूत्रांनी सांगितले.
राजू शेट्टी राज्य पिंजून काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:49 IST