आयुब मुल्ला - खोची -विधानसभा निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची डिपॉझिट जप्त झाली. पहिल्या पाच उमेदवारांतसुद्धा स्थान मिळाले नाही. यामुळे पक्षाची वाताहत झाली. याचे मूळ पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी केलेले दुर्लक्ष व नाराजी हे होते; परंतु आता पक्षाच्या बळकटीकरणासाठी यड्रावकर गटाला सक्रिय व्हावे लागणार आहे. काल, शनिवारी जयसिंगपूर येथे झालेल्या शिरोळ विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या आभार मेळाव्यात राजेंद्र पाटील यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवूनच पक्ष बांधणीचे काम करणार असल्याचे सांगितले. या मेळाव्यास हातकणंगले तालुक्यातील यड्रावकर गटाचेही कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे शिरोळबरोबरच हातकणंगलेची राष्ट्रवादीची मुख्यत्व जबाबदारी आता त्यांच्याच खांद्यावर आली आहे.शिरोळ व हातकणंगले तालुक्यांत गेली अनेक वर्षे यड्रावकर गट कार्यरत आहे. राजेंद्र पाटील यांनी हातकणंगले तालुक्यात राजकीय रणांगणावर आपला गट पक्षीयदृष्ट्या कधी सक्रिय केला नव्हता. शिरोळमध्ये मात्र सक्रिय केला होता. हातकणंगले तालुक्यात ‘शरद साखर कारखाना’ उत्तमरीतीने चालविला आहे. त्या माध्यमातून राजकारण न करता सर्वसमावेशक कामाची पद्धत त्यांनी अवलंबली. त्यामुळे या तालुक्याच्या राजकारणात त्यांनी आपले उपद्रवमूल्य कोणाला जाणवू दिले नाही.आता मात्र त्यांना कार्यकर्त्यांच्या अस्तित्वासाठी इथल्या राजकारणात सक्रिय व्हावे लागणार आहे. गटाच्या अस्तित्वाची ओळख करून द्यावी लागणार आहे. कारण हातकणंगलेच्या राजकारणाची पूरकता शिरोळसह इचलकरंजी मतदारसंघालाही लाभदायक ठरते. त्यांच्या नेतृत्वाखालील यड्रावकर उद्योग समूहाचे नेटवर्क या तीनही ठिकाणी आहे, याची दखल पक्षालाही आहे.पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील पराभवाची कारणमीमांसा तपासण्यासाठी जिल्हावार नेत्यांच्या बैठका घेण्याचे जाहीर केले आहे. पराभूत उमेदवारांशीही ते स्वत: चर्चा करणार आहेत. यातून बरेच काही संदर्भ पुढे येणार आहेत. या दोन तालुक्यांचा विचार करता पक्षाला शिरोळमध्ये क्रमांक दोनची मते मिळाली. हातकणंगलेत मात्र फारच लांब राहावे लागले. हे पाहता पक्षाला उभारी देण्यासाठी दस्तुरखुद्द शरद पवारच यड्रावकर यांच्यावर आता हातकणंगलेकडेही लक्ष देण्याची सूचना करतील, अशी स्थिती आहे.
राष्ट्रवादी बळकटीकरणासाठी राजेंद्र पाटील होणार सक्रिय
By admin | Updated: November 9, 2014 23:37 IST