कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांनी राजेपद भोगण्यापेक्षा मला काहीतरी सर्वधर्मिय गरीब जनतेसाठी केले पाहिजे. या क्रांतिकारक भूमिकेतून संपूर्ण राज्यात अनेक ठिकाणी वसतिगृहे निर्माण केली. त्यांच्या देण्याच्या दैवतपणामुळेआजच्या काळातही ‘बहुजनपर्व’सारख्या ग्रंथांची निर्मिती होते, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब शिंदे यांनी काढले. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्यावतीने आयोजित ‘बहुजनपर्व’ या संस्थेच्या ९० वर्षांच्या वाटचालीच्या ग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज होते. शिंदे म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी त्याकाळी केवळ आपण राजे नसून जनतेचे काहीतरी देणे लागतो. आपल्या राजेपदापेक्षा मुक्ती महत्त्वाची आहे. स्वत:च्या राजे किंवा गादीच्या मोहात न रमता अनेक सामाजिक विचार, संस्कार आणि स्वत:हून कोल्हापुरात २३ वसतिगृहे त्याकाळी निर्माण केली. त्यांच्याप्रती आजही आपल्यासारख्या माणसांच्या शरीराच्या कातड्याचे जोडे करून त्यांना वाहिले तरी त्यांचे ऋण संपणार नाही. यावेळी त्यांनी प्रिन्स शिवाजी बोर्डिंगमधील वसतिगृहात राहताना ‘नाट्यसृष्टीची शंभर वर्षे ’ हा निबंध लिहून प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविल्याचा किस्साही सांगितला. त्यासह ज्यांनी माझे पालकत्व घेतले, त्या राजाराम महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य व शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार यांच्याबद्दलची आठवणही सांगितली. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल कौतुक केले. प्रा. सी. एम. गायकवाड यांनी प्रास्ताविक, तर कार्यकारिणी सदस्य ए. जी. वणिरे यांनी ग्रंथाबद्दल माहिती दिली. यावेळी माजी कुलगुरु रा. कृ. कणबरकर, संस्थाध्यक्ष एस. आर. चरापले, चेअरमन डी. बी.पाटील, शशिकला शिंदे, ज्येष्ठ नेते गोविंदराव पानसरे, ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, आर.डी.आतकिरे, प्राचार्य एन.व्ही.नलवडे, आर. डी. पाटील आदी उपस्थित होते.
राजर्षी शाहूंमुळेच घडले ‘बहुजनपर्व’
By admin | Updated: December 4, 2014 00:50 IST