लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. गगनबावडा, राधानगरी, भुदरगड तालुक्यात मात्र पावसाचा जोर कायम असून, गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ७५.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील सहा बंधारे पाण्याखाली असून करूळ घाटात दरड कोसळल्याने कोकणातील वाहतूक भुईबावडा मार्गे वळवण्यात आली आहे.
जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने चांगली हजेरी लावली आहे. चार-पाच तालुक्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. उर्वरित तालुक्यांसह कोल्हापूर शहरात मात्र पावसाची रिपरिप राहिली आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ७५.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. भुदरगड तालुक्यात ३४.२ मिलिमीटर झाला असून तुलनेत हातकणंगले व शिरोळ तालुक्यात कमी पाऊस आहे.
धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे. गगनबावडा तालुक्यातील ‘कुंभी’ धरणक्षेत्रात २०६ मिलिमीटर नोंद झाली आहे. राधानगरी धरणातून वीजनिर्मितीसाठी प्रतिसेंकद १२००, ‘वारणा’मधून ७००, तर ‘दूधगंगा’तून १०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील विविध नद्यांवरील ‘शिंगणापूर’, ‘राजाराम’, ‘ सुर्वे’, ‘रुई’, ‘इचलकरंजी’, ‘तेरवाड’ हे सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सोमवारी करूळ घाटात दरड कोसळल्याने कोकणातील वाहतूक बंद होती. ही वाहतूक भुईबावडा मार्गे वळवण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने दिली आहे.
शेतीला पोषक असाच पाऊस
‘मृग’ नक्षत्रात चारच दिवसांत धुवादार पाऊस झाला. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. बांध फुटीसह ऊस पिके आडवी झाली. त्यामुळे जिरवण्याचा पाऊस शेतकऱ्यांना अपेक्षित असतो. त्याप्रमाणे या नक्षत्रात शेतीस पोषक असाच पाऊस सुरू आहे.
धरणातील पाणीसाठी असा, टीएमसी-
राधानगरी (२.८९), तुळशी (१.७२), वारणा (२०.८५), दूधगंगा (९.७२), कासारी (१.३७), कडवी (१.०८), कुंभी (१.५३), पाटगाव (१.९४).
फोटो ओळी : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. मंगळवारी पंचगंगा नदीकाठावरील मंदिरे पाण्याखाली जाऊ लागली आहेत. (फाेटो-१३०७२०२१-कोल-रेन ) (छाया- नसीर अत्तार)