कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर पावसाची उघड-झाप राहिली. अधूनमधून जोरदार सरी कोसळत असल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत तब्बल दोन फुटाने वाढ झाली आहे.
पावसाची उघड-झाप असली तरी अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. गुरुवारी रात्री जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. शुक्रवारी सकाळपासून अनेक ठिकाणी हलक्या, तर काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. धरण क्षेत्रातही सरासरी ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस राहिल्याने धरणातून विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद १४०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वारणा धरणातून ३२४८ विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चाेवीस तासांत पंचगंगेची पातळी २५.४ फुटांवर राहिली. सोळा बंधारे पाण्याखाली असून, या मार्गावरील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली.
खरीप पिकांना पोषक असाच पाऊस पडत असल्याने पिकांची वाढ जोमात आहे. विशेषत: भात पिकांची वाढ चांगली असून, अजून किमान पंधरा दिवस पावसाची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.