लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी ढगाळ वातावरणासह पाऊस झाला. तापमानात काहीसी घसरण झाली होती. कमाल तापमान २६ डिग्रीपर्यंत खाली आले होते. सलग तीन दिवस पाऊस सुरू असल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. आज, बुधवारी पावसाची शक्यता धूसर असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
‘तौक्ते’ चक्रीवादळाने गेले तीन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. रविवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. मात्र, सोमवारपासून वाऱ्याचा प्रवाहासह पाऊसही कमी झाला आहे. सोमवारी दुपारनंतर ऊन पडले होते. मात्र, मंगळवारी पहाटेपासून पावसाची भुरभुर सुरू झाली. सकाळी दहापर्यंत भुरभुर कायम राहिली. दिवसभर मात्र ढगाळ वातावरण राहिले. दुपारी दोन वाजता कोल्हापूर शहरात जोरदार पाऊस कोसळला. जिल्ह्याच्या अनेक भागातही पाऊस झाला. तापमानातही घसरण झाली, कमाल २६ डिग्री, तर किमान २२ डिग्रीपर्यंत राहिले. या पावसाने शेतीची कामे खोळंबली असून, खरीप पेरणी काहीशी लांबणीवर पडणार आहे. काढणीस आलेली उन्हाळी पिके अडचणीत आली आहेत. भुईमूग, भाताची काढणी थांबल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
दरम्यान, आज, बुधवारी तापमानात थोडी वाढ होणार असून पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
वीट व्यावसायिकांचे नुकसान
वीट हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. त्यात गेले तीन दिवस पाऊस कोसळत असल्याने कच्च्या विटा भिजल्याने वीट व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
भाजीपालाही आला धोक्यात
अगोदरच लॉकडाऊनमुळे भाजीपाला शिवारात पडून आहे. त्यातही वादळी पावसाने वांगी, कोबी, दोडका, गवारी या पिकांना झोडपून काढले आहे. ढगाळ वातावरण किडीला निमंत्रण देणारे असल्याने आता भाजीपालाही धोक्यात आला आहे.
फोटो ओळी :
आंबा नव्हे, जोतिबा.... कोल्हापूर जिल्ह्यात गेले तीन दिवस पाऊस सुरू आहे. मंगळवारी ढगाळ वातावरणामुळे जोतिबा डोंगरावर ढग उतरले होते. (फोटो-१८०५२०२१-कोल-रेन रेन०१ व रेन०२) (छाया- आदित्य वेल्हाळ)