कोल्हापूर : राधानगरी अभयारण्यावर मागवण्यात आलेल्या लोगोेचे उद्या सोमवारी (दि.२५) कोल्हापुरात शाहू स्मारक येथे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. शुक्रवार, २९ पर्यंत चालणाऱ्या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) वि. ह. माळी यांनी केले आहे.
राधानगरी अभयारण्याकरिता लोगो निर्धारित करण्याच्या उद्देशाने वन्यजीव विभागामार्फत ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये लोगो स्पर्धा घेण्यात आली होती. यात १०० पेक्षा जास्त निसर्गप्रेमींनी लोगो पाठविले. लोगोंमध्ये डिझायनिंगची कला उत्तमपणे वापरत जंगल वन्यजीव-गवा, शेकरू, फुलपाखरू तसेच राजर्षी शाहू महाराजांवर अनेक अप्रतिम लोगो पाठविले आहेत. राधानगरी अभयारण्य पर्यटनाचे आवडते स्थान असून सुटीच्या दिवशी पर्यटकांचा मोठा ओढा असतो. राऊतवाडी धबधबा, राधानगरी धरण, बोरबेट पदमसती, दाजीपूर ट्रेक, दाजीपूर सफारी, देवराया ही सर्वस्थाने निसर्ग वेड्या लोकांना आकर्षित करत असतात. या प्रदर्शनाच्या निमित्ताने राधानगरीची सफर अनुभवता येणार आहे.