कोल्हापूर : दिवसभर उसंत घेत पाऊस रात्रभर झोडपून काढत असल्याने जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल ३४ बंधारे पाण्याखाली गेले असून, गोठे धरणावर पाणी आल्याने रंकाळा ते मानबेट मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. आठ मार्गांवरील वाहतूक अंशत: बंद, तर पाच मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. धरणक्षेत्रांतही दमदार पाऊस असल्याने रोज धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरण ६२, तर वारणा ५५ टक्के भरले आहे. काल, शनिवारी दिवसभर पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता; पण रात्रभर पावसाने अक्षरश: झोडपून काढले. पुन्हा सकाळपासून विश्रांती घेतली आहे. आज, रविवारी सकाळी ९ वाजून ४२ मिनिटांनी सूर्याने ‘पुष्य’ नक्षत्रात प्रवेश केला. या काळात पडणाऱ्या पावसाला ‘म्हातारा’ पाऊस म्हणतात. वाहन ‘मेंढा’ असून, हा पाऊसही तरण्या पावसासारखा दमदार होईल, अशी अपेक्षा बळिराजाला आहे. खरीप पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी आता पावसाची उघडीप अडचणीत आणू शकते. भात व नागली रोप लावणीला सातत्याने पाणी लागत असल्याने पावसामध्ये सातत्य राहणे गरजेचे आहे. धरणक्षेत्रांत चांगला पाऊस असल्याने धरणांच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. आज सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत राधानगरी धरणक्षेत्रात ९९, वारणा ४५, तर दूधगंगा धरणक्षेत्रात तब्बल १०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे काल, शनिवारपेक्षा राधानगरी धरणाच्या जलाशयात ०.३६, तर वारणाच्या जलाशयात ०.७७ टी.एम.सी. पाणीसाठा वाढला आहे. पंचगंगा नदीची पातळी ३४ फुटांवर गेली आहे. पंचगंगेसह नऊ नदींवरील तब्बल ३४ बंधारे पाण्याखाली गेले असून, गोठे धरणावर पाणी आल्याने रंकाळा ते मानबेट मार्ग पूर्णपणे बंद राहिला आहे. त्याचबरोबर आठ मार्गांवरील वाहतूक अंशत:, तर पाच मार्गांवर पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. (प्रतिनिधी)तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये -करवीर - २०.६८, कागल - २४.४१, पन्हाळा - ४७.८५, शाहूवाडी - ६८, हातकणंगले - १६.५५, शिरोळ - १२.२८, राधानगरी - ४९.८३, गगनबावडा - १३५.०५, भुदरगड - ३०.४०, गडहिंग्लज-५५, आजरा - ४१.५०, चंदगड -४२.१६.
राधानगरी ६२ टक्के भरले
By admin | Updated: July 21, 2014 00:41 IST