एकनाथ पाटील - कोल्हापूर - ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाची व्याप्ती वाढल्याने त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्याची जबाबदारी फक्त कोल्हापूर पोलिसांवर राहिली नसून, ती राज्यातील सर्व पोलिसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह पुणे, कऱ्हाड, कोल्हापूर व कर्नाटकातील ‘सुपारीबाज गुंड’ पोलिसांच्या रडारवर असून, त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू ठेवली आहे. गुन्हेगारांच्या नेटवर्कमधूनच मारेकऱ्यांचे नाव पुढे येणार असल्याने गुन्हेगारी टोळ्यांच्या हालचालींवर पोलिसांनी नजर ठेवली आहे. महाराष्ट्रातील गुन्हेगार गुन्हे करून कर्नाटकात पळ काढतात; तर कर्नाटकातील गुन्हेगार महाराष्ट्रात आश्रयाला येतात. गुन्हेगारांचे नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्र-कर्नाटकात पसरले आहे. पानसरे यांच्यावर गोळीबार करणारे मारेकरी ‘सुपारीबाज गुंड’ असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात आढळल्याने त्याची व्याप्ती वाढली आहे. त्यामुळे राज्यभरात जिल्हास्तरावर असलेले प्रत्येक पोलीस ठाणे, स्पेशल क्राइम ब्रँच पथकांकडून स्थानिक सुपारीबाज गुंडांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जात आहे. पोलिसांना बाहेरच्या जिल्ह्यांतील गुन्हेगारांची ओळख नसल्याने ते जिल्ह्यात बिनदिक्कतपणे वावरत असतात. त्यांच्याकडून हल्ला झाल्याची दाट शक्यता असल्याने पोलीस प्रशासनाने खबरदारी घेतली असून, गुंडांचे महिन्याभरामध्ये वास्तव्य नेमके कोठे होते, याची माहिती घेतली जात आहे.
राज्यातील ‘सुपारीबाज गुंड’ पोलिसांच्या रडारवर
By admin | Updated: February 23, 2015 00:15 IST