जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यात शेतकरी संघटनेचा उगम झाल्यामुळे माझा पहिला सत्कार शिरोळ तालुक्यातच झाला, याचा मला अभिमान आहे़ त्यामुळे मी प्रत्येक शेतकऱ्याचा आमदार असून, हे पद मी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना समर्पित करीत आहे़ शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी विधान परिषदेत आता आवाज उठविणार असल्याचे प्रतिपादन नूतन आमदार सदाभाऊ खोत केले़ उदगाव (ता़ शिरोळ) येथे नूतन आमदार सदाभाऊ खोत यांचा सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते़ यावेळी खोत बोलत होते़ प्रथम जयसिंगपूर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली़ यावेळी खासदार राजू शेट्टी व वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तूपकर यांच्या हस्ते खोत यांचा सत्कार करण्यात आला़ अध्यक्षस्थानी खासदार शेट्टी होते़ यावेळी प्रास्ताविक विठ्ठल मोरे यांनी केले़ स्वागत जालिंदर काटे यांनी केले़आमदार खोत पुढे म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटना विस्ताराने मोठी करण्यासाठी राज्यातील कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, विविध चळवळींच्या माध्यमातून जे राज्यातून प्रेम मिळाले, त्याच्याच पाठबळावर मी बिनविरोध आमदार म्हणून निवडून आलो आहे़ अध्यक्षस्थानावरून बोलताना खासदार शेट्टी म्हणाले, चळवळीचे योगदान आणि निष्ठेचे फळ म्हणून सदाभाऊंना आमदारकी मिळालेली आहे़ शेतकऱ्यांच्या नेत्याचा आवाज विधान परिषदेत घुमणार असून, शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी अधिक जोमाने काम करू, काहीजणांनी आमच्यावर टीका केली की, सदाभाऊंना आमदारकी दिली जाणार नाही़ पण, आता त्यांची तोंडे बंद झालेली आहेत़ यावेळी रविकांत तूपकर म्हणाले, तीस वर्षांपासून सुरू असलेली लढाई आता सत्यात उतरली असून, शेतकऱ्यांचा आणखी एक खमक्या नेता तयार झाला आहे़ त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे़ सदाभाऊंची आमदारकी ही प्रत्येक कार्यकर्त्यांची असून, पुढील येणाऱ्या निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे़ यावेळी जालिंदर पाटील, भगवान काटे, सावकार मादनाईक, राजेंद्र गड्ड्याण्णावर, मिलिंद साखरपे, विठ्ठल मोरे, शैलेश आडके, जयकुमार कोले, रामचंद्र कडाळे, सुरेश कांबळे, तानाजी देसाई, श्रीकांत घाटगे, अनंतमती पाटील, सुवर्णा अपराज, स्वाती पाटील, आदिनाथ हेमगिरे, वैभव कांबळे यांच्यासह सांगली, कोल्हापूर आदी जिल्ह्यांतून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते़
शेतकऱ्यांचे प्रश्न आता विधान परिषदेत मांडणार
By admin | Updated: June 6, 2016 00:51 IST