श्रीकांत चाळके -खेड , अंगणवाडीतील मुलांचे आरोग्य उत्तम राहावे, याकरिता राज्य सरकारने विविध उपक्रमांचा अवलंब केला आहे. मूठभर धान्य योजनेच्या माध्यमातून या मुलांच्या प्रकृतीला आकार देणे आणि त्याद्वारे कुपोषण टाळणे, हे काम आता अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आले आहे. मात्र, हे काहीसे कठीण काम आहे. राज्य सरकारने हे काम अंगणवाडी सेविकांवर लादले असले तरी मुलांच्या कुपोषणाच्या ओझ्याखाली या सेविका पुरत्या दबल्या जाणार आहेत. त्यामुळे दुर्लक्षित होणाऱ्या मुलांच्या दैनंदिन मानसिक वाढीची जबाबदारी सरकारने घ्यावी, असा सूर आता अंगणवाडी सेविकांनी लावला आहे़कुपोषणाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सरकारने आता मूठभर धान्य योजना आणली आहे. हे धान्य गावात फिरून सेविकांनी जमवायचे आहे. यापासून पोषण आहार बनवून तो विद्यार्थ्यांना खायला द्यायचा आहे. ही सारी जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आली आहे. हे कमी म्हणून की काय, गावात ग्रामस्थांची बैठक घेऊन कुपोषणाचे दुष्परिणाम समजावून सांगणे, त्याविषयी जनजागृती करणे आदी कामे याच सेविकांनी करायची आहेत. यामुळे अंगणवाडी सेविकांच्या मूळ जबाबदारीकडे दुर्लक्ष होणार आहे. त्यामुळे या कामाची जबाबदारी सरकारने घ्यावी. मुळातच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्याच्या २८३१ अंगणवाड्यांतील बालकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येते़ जिल्ह्यात 0 ते ६ वयोगटातील १ लाख ५ हजार २७४ मुले आहेत. त्यातील ३१६ मुले कुपोषित असल्याचे समोर आले आहे. खेडमध्ये तर हे प्रमाण अवघे १ आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने कुपोषणाचे हे प्रमाण अत्यल्प असले तरी चिंताजनक आहे. आवश्यक कॅलरीज आणि पोषक तत्व यांची निरंतर कमतरता किंवा असंतुलन यामुळे मुले कुपोषित होतात. जन्मत: कमी वजनाची मुले जन्माला येणे, आहार व संगोपनाच्या पध्दती, अतिसार, न्युमोनिया, रक्तात लोहाची कमतरता, अ जीवनसत्त्वाची कमतरता, अपूर्ण लसीकरण आणि जंत ही कुपोषणाची प्रमुख कारणे आहेत. प्रकृतीने अशक्त असलेल्या मुलांना सध्या अंगणवाड्यांमधून पोषक पदार्थ पुरविले जात आहेत़ या मुलांची तपासणी तज्ज्ञांकडून केली जाते. अंगणवाडी सेविकांच्या कामामध्ये आता मूठभर धान्य योजनेची भर पडली आहे़ या योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांनी गावात जाऊन धान्य जमा करायचे आहे. जमा झालेल्या धान्याचे वेगवेगळे पदार्थ तयार करून ते मुलांना खायला द्यायचे आहेत़ प्रात्यक्षिकही ग्रामस्थांना दाखवायची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर पडली आहे़
सेविकांचा प्रश्न कायम टांगणीवर
By admin | Updated: August 5, 2014 00:19 IST