राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यात एकेकाळचा सत्ताधारी व प्रमुख कणखर विरोधी पक्ष असणारा व जय-पराजयाची पर्वा न करता सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जाणारा शेतकरी कामगार पक्षाचा ‘खटारा’ दिसण्याची शक्यता कमी आहे. हक्काच्या करवीर मतदारसंघातून ‘शेकाप-जनसुराज्य’ आघाडीच्यावतीने असले तरी ‘नारळ’ घेऊन करवीर पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र सूर्यवंशी लढणार आहेत. उर्वरित ठिकाणी पक्षाची फारशी ताकद नसल्याने विधानसभा निवडणूक ‘शेकाप’च्या चिन्हावर लढण्याची शक्यता धूसर बनली. या निर्णयामुळे पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकेकाळी ‘शेकाप’ म्हणजे कोल्हापूर जिल्हा अशीच ओळख होती. कालांतराने पक्षाची ताकद कमी होत गेली; पण करवीर, कोल्हापूर शहर व राधानगरी तालुक्यात पक्षाची निर्णायक ताकद राहिली. या ताकदीच्या बळावरच सांगरूळ मतदारसंघातून तीनवेळा ‘शेकाप’चा आमदार निवडून आला. यामध्ये १९८५ला गोविंदराव कलिकते, १९९५ व १९९९ ला संपतराव पवार-पाटील यांनी बालेकिल्ला अबाधित राखला; पण २००४ ला पवार यांचा पराभव झाला आणि कार्यकर्ते बाजूला जाऊ लागले. पुढे पुनर्रचनेत सांगरूळ मतदारसंघ संपुष्टात आला आणि करवीरमधून पवार यांनी निवडणूक लढवत प्रस्थापितांना टक्कर देण्याचा प्रयत्न केला; गेल्या पाच वर्षांत ‘भोगावती’ कारखान्यातील यश सोडले, तर सर्व ‘शेकाप’ची पिछेहाट झाली. तरुणांची वाढती संख्या व पक्षासमोरील अडचणी वाढल्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत संपतराव पवार यांना अपयश आले. त्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर करवीरमधून राजेंद्र सूर्यवंशी यांनी तयारी केल्याने त्यांचे नाव निश्चित होईल, असे वाटत होते. आज, शुक्रवारी जनसुराज्य-शेकाप आघाडी झाली. आघाडीचा उमेदवार म्हणून सूर्यवंशी यांची घोषणाही झाली. कार्यकर्ता ‘शेकाप’चा चिन्ह ‘जनसुराज्य’चे घेऊन सूर्यवंशी रिंगणात उतरणार. करवीरमध्ये ‘शेकाप’ची ताकद असल्याने हीच जागा लढविण्याची शक्यता होती. कोल्हापूर दक्षिण व उत्तरमधून पक्षाच्यावतीने निवडणूक लढविण्याची शक्यता धूसर आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत ‘शेकाप’ आघाडीच्या माध्यमातून सहभागी होत असला तरी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची शक्यता कमी आहे. ‘खटारा’ची आठवण!पंधरा ते वीस वर्षांपूर्वीचा काळ ‘शेकाप’च्या ‘खटारा’ या चिन्हाने गाजविला. मध्यंतरी निवडणूक आयोगाने हे चिन्ह गोठविले होते. यावेळी पुन्हा ‘शेकाप’ला हे चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे बऱ्याच वर्षानंतर बॅलेट पेपरवर ‘खटारा’ दिसणार होता, पण आता शक्यता धूसर आहे. ‘जनसुराज्य’ची जनता दलाशी चर्चा जनसुराज्य-शेकाप आघाडी झाल्यानंतर आता जनता दलाशी आघाडीबाबत चर्चा सुरू झाली आहे. येथून आघाडीच्यावतीने गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांची उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता आहे.
‘शेकाप’च्या अस्तित्वासमोर प्रश्नचिन्ह
By admin | Updated: August 17, 2014 00:52 IST