लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांची तपासणी दहा दिवसांत पूर्ण करून तातडीने अनुदान देण्याबाबत कार्यवाही होईल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील व आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित शाळा कृषी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री गायकवाड यांची भेट घेतली.
जुनी पेन्शन योजनेबाबतची अधिसूचना, नवीन नेमलेली सम्यक कमिटी, नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांना मान्यता द्यावी आदी मागण्यांबाबतही सकारात्मक निर्णय घेऊ. त्याचबरोबर शंभर टक्के अनुदानित शाळांवर अतिरिक्त झालेल्या शिक्षकांना सेवा संरक्षण आहे, त्याच धर्तीवर अंशत: अनुदानित शाळांतील अतिरिक्त शिक्षकांना सेवा संरक्षण देण्याबाबत विचारविनिमय सुरू असल्याचे मंत्री गायकवाड यांनी सांगितले. यावेळी खंडेराव जगदाळे, बाबासाहेब पाटील, सुरेश संकपाळ, भरत रसाळे, उदय पाटील आदी उपस्थित होते.
मुजोर अधिकाऱ्यांवर थेट कारवाई
काही जिल्ह्यात तपासणी, वेतन निश्चिती, पेन्शन आदी कामांच्या मंजुरीमध्ये पैशाची मागणी करणे, शिक्षकांना त्रास देण्याचे काम काही अधिकारी करीत असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर अशा मुजोर अधिकाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचा इशारा मंत्री गायकवाड यांनी दिला.
मंत्री गायकवाड १६ जानेवारीला कोल्हापूर दौऱ्यावर
मंत्री वर्षा गायकवाड यांना कोल्हापूर दौऱ्यावर येण्याबाबत राज्यमंत्री सतेज पाटील व आमदार आसगावकर यांनी विनंती केली. यावर १६ जानेवारी रोजी येण्याचे त्यांनी मान्य केले.