रमेश पाटील । लोकमत न्यूज नेटवर्ककसबा बावडा : विज्ञानाचे शिक्षण घेताना विद्यार्थ्याला या विषयाची गोडी वाटावी, प्रयोगशाळेत त्याला भरपूर प्रयोग करता यावेत, तसेच पुढे दहावीला विज्ञान विषयाची भीती वाटू नये, यासाठी करवीर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये लोकसहभागातून ‘शाळा तिथे प्रयोगशाळा’ हा उपक्रम येत्या शैक्षणिक सत्रापासून मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक गावातील सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्तींच्या मदतीतून ही शाळांमध्ये प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. यासाठी करवीर पंचायतचा शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. सध्या जि.प.च्या अनेक शाळांमध्ये सर्व सोयींनी युक्त अशा प्रयोगशाळा नाहीत. विज्ञानाचे प्रयोग करताना केमिकल, स्पिरिट दिवा, परीक्षण नळी, सूक्ष्मदर्शक यंत्रे, विविध प्रकारची भिंगे, जीवशात्राचे तक्ते, भौतिकशास्त्राची साधणे, इलेक्ट्रिक साधने, अशा विविध वस्तंूची कमतरता आहे. बऱ्याच वेळेला शिक्षकांना केवळ पुस्तकी ज्ञानावरच विद्यार्थ्यांना शिकविण्यावर भर द्यावा लागतो. वरील सर्व साहित्य जर प्रयोगशाळेत भरपूर प्रमाणात उपलब्ध असेल तर प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना या साधनांच्या आधारे प्रयोग करता आले असते. त्यामुळे विद्यार्थ्याला या विषयाची गोडी प्राथमिक शिक्षण घेतानाच मोठ्या प्रमाणात आली असती; परंतु सध्या जि.प.च्या शाळांमध्ये अशा साधनांची काही प्रमाणात कमतरता आहे. ही वस्तुस्थिती आहे.यावर तोडगा म्हणून करवीर पंचायतच्या शिक्षण विभागाने तालुक्यातील सर्व शाळांमध्ये ‘लोकसहभागातून शाळा तिथे प्रयोगशाळा’ ही संकल्पना आणली. पंचायतच्या मासिक सभेत ही संकल्पना सदस्यांना समजावून सांगितली. सभापती प्रदीप झांबरे, गटविकास अधिकारी राजेंद्र भालेराव, तसेच सदस्य यांनी याला संमती दर्शविली. त्यामुळे ‘लोकसहभागातून प्रयोगशाळा’ हा उपक्रम आता आकारास येणार आहे.‘शाळा तिथे प्रयोगशाळा’ यासाठी प्रत्येक शाळेच्या प्रयोगशाळेसाठी सुमारे ४० ते ५० हजारांची गरज भासणार आहे. सेवाभावी संस्था किंवा दानशूर व्यक्तींनी प्रत्यक्ष शाळेत जाऊन त्यांना प्रयोगशाळेसाठी कोणत्या वस्तू नाहीत याची माहिती घेऊन त्यांना त्या वस्तू घेऊन द्यायच्या आहेत किंवा मदत करायची आहे. यापूर्वी दोन शाळेत लोकप्रतिनिधींनी मदत केली आहे. जि.प.च्या शाळेतील प्रयोगशाळेसाठी ज्या गावात शाळा आहे, अशा गावातील नागरिकांनी, तसेच सेवाभावी संस्थांनी शाळांना मदत करावी. मग, ती मदत वस्तुरूपात असली तरी चालेल.- प्रदीप झांबरे, सभापती, करवीर पंचायत समिती. करवीर तालुका आघाडीवरकरवीर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने यापूर्वी ‘केटीएस’ करवीर प्रज्ञाशोध परीक्षा हा उपक्रम संपूर्ण तालुक्यात यशस्वी राबविला. त्यानंतर ‘एरोबिक्स’ हा संगीतावर आधारित व्यायाम प्रकार संपूर्ण शाळेत राबविला. हे दोन्ही उपक्रम यशस्वी झाले. आता त्यानंतर ‘शाळा तिथं प्रयोगशाळा’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. हे निर्णय घेण्यापूर्वी सभागृहात याला मंजुरी घेतलेली असते.विज्ञानसारख्या विषयाची गोडी वाढायची असेल, तर विद्यार्थ्यांला प्राथमिक शिक्षणापासूनच प्रयोगशाळेत भरपूर प्रयोग करायची संधी द्यायला हवी, तरच त्याच्यामध्ये विज्ञानाची गोडी वाढेल. सूक्ष्मदर्शक यंत्रे, परीक्षानळी, स्पिरिट दिवा, चंचूपात्र या वस्तूंना त्यांना हात लावायला मिळाला पाहिजे. - आर. जी. चौगले, शिक्षण अधिकारी, करवीर पंचायत समिती,
लोकसहभागातून ‘शाळा तिथं प्रयोगशाळा’
By admin | Updated: May 26, 2017 00:44 IST